होम आयसोलेशन बंद; उशिरा सुचलेले शहाणपण

शून्य प्रहर | हेमंतकुमार कुलकर्णी 

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक हा निर्णय दुसरी लाट सुरू झाली त्याच वेळी घेणे गरजेचे असताना फारच उशिरा घेतला गेला मात्र उशिरा का होईना निर्णय घेतल्याने सरकारला सुचलेले हे उशिरा चे शहाणपण आहे असेच म्हणावे लागेल. सिंधुदुर्ग रेडझोन व्हायला सिंधुदुर्गचे प्रशासनच जबाबदार आहे. राज्यकर्त्यांच्या ताब्यात प्रशासन नसल्याने हा प्रकार घडला आहे. वेळोवेळी आलेल्या आदेशाना केराची टोपली दाखवण्याचे काम सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांचा बोलघेवडेपणा यामुळे सिंधुदुर्ग वर लाल शिक्का बसण्याची वेळ आली.

यामध्ये प्रामुख्याने होम आयसोलेशन व वाहतुकीचे नियम न पाळणे या दोन गोष्टी घातक ठरल्या. घरातच कोविड पेशंटचा गुणाकार होत आहे. यामुळे अनेक पेशंट वाढत होते. प्रशासन कोविड पेशंटकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने गंभीर समस्या होती. पूर्वी गावो गाव काम करणाऱ्या कोविड समित्या हळूहळू काम करीनाश्या झाल्या. ज्यांना कोविड झाला आहे, त्यांचा रोष कोण ओढवून घेणार? असा प्रश्न निर्माण झाल्याने दुर्लक्षाची भूमिका स्थानिक प्रशासनाने घेतली. प्रहार डिजिटल ने फार सुरुवातीलाच सिंधुदुर्गला होम आयसोलेशन घोर घातक ठरणार याचा अंदाज बांधला होता. आणि तो पक्का ठरला. सिंधुदुर्गमध्ये नागरिक बाहेर फिरल्याने नव्हे, तर घरात असल्याने कोरोना पॉसिटीव्ह झाले होते. मात्र प्रशासन खऱ्या बाबीकडे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेऊन होते. याला जागे करण्याचे काम करणार कसे? हा प्रश्न होता.

वारंवार लॉकडाऊन जनता सहन करुन घेणार नाही. लॉकडाऊन लावूनही काय उपयोग होत नाही. बाजारात फिरून जर कोरोना पसरला असता तर व्यापारी कोरोना पॉसिटीव्ह झाले असते. मात्र तसे फारसे दिसून येत नाही. वाहतुकीबाबत दाखवलेला गलथानपणा कोरोना वाढवण्यास कारणीभूत ठरला. ड्रायव्हर क्लिनर यांना दिलेली टेस्ट मधली सूट, त्यांची कुठेही नोंद नसणे, बेदरकार चालू असलेली नियमबाह्य प्रवासी वाहतूक सेवा या कोरोना वाढीला कारणीभूत ठरले. पोलिसांनी अर्थपूर्ण व्यवहार करून या सर्व वाहतुकीला मुभा दिली. आज ते जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातही संधी बघून पैसे खाणाऱ्या वर्गाचे फावले आहे. त्यांना कोविडशी काही देणे घेणे नाही.

टू व्हीलर पोलिसांचे सॉफ्ट टार्गेट

पोलीस कोविडचे नियम राबवताना टू व्हीलर चालवणाऱ्यांना सॉफ्ट टार्गेट करतात असे दिसून आले आहे. बऱ्याच वेळा फोर व्हीलर चालवणारे व इतर वाहनधारक सहज निघून जातात असे दिसून आले आहे. ते कोविड पसरवत नाही का? असा सवाल टू व्हीलर वाल्यांचा आहे. होम आयसोलेशन बंद होणे हे कोविड जाण्याचे पहिले पाऊल आहे. होम आयसोलेशन बंद करणे व लसीकरण चालू करणे हाच अंतिम उपाय आहे.