राहुल गांधी “रिकामे”, सामनातून राहुल गांधींवर शिवसेनेची बोचरी टीका

प्रहार  डिजिटलच्या  व्हाट्सअँप ग्रुप ला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

सामना वाचून सोनिया गांधी काँग्रेसला मार्गदर्शन करतात; सामनाची दर्पोक्ती

शून्यप्रहर । हेमंतकुमार कुलकर्णी

सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष झाल्यापासून राहुल गांधी हे रिकामेच आहेत. अशा शब्दात शिवसेनेच्या मुखपत्रातून राहुल गांधींवर बोचरी टीका करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांचा “रिकामे” हा उल्लेख काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, सत्तेतील सहभागी पक्ष असल्याने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय. सामनाने आज ‘सोनियांचा संदेश’ या नावाने अग्रलेख प्रसिद्ध केला आहे.

विशेष म्हणजे या अग्रलेखामध्ये सामना वाचूनच सोनिया गांधी यांनी आपल्या कार्यसमितिमध्ये पक्षाची भूमिका मांडली व तयार केली. असा उल्लेख केला आहे . यामुळे सामनाचे संपादक सोनिया गांधीना काँग्रेस कशी चालवावी हे शिकवतात काय? असा प्रश्न निर्माण होतो.

शिवसेना ज्याचे अस्तित्व मुंबई व काही प्रदेश वगळून महाराष्ट्राबाहेर नाही. तो पक्ष सोनिया गांधीना काँग्रेस कशी चालवावी हे शिकवतो. शिवाय तो आपल्या वृत्तपत्रातून सल्ले देतो, आणि सोनिया गांधी ते वाचून अमलात आणतात. असे अग्रलेखात लिहिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी अतिशय सक्रिय असलेले नेते होते. त्याने अनेक सभा घेतल्या व पक्षाचा प्रचार केला.

मात्र सामनाने अग्रलेखा मध्ये ते रिकामे असा उल्लेख केल्याने अप्रत्यक्षरीत्या महाराष्ट्रातील सत्तेच्या सहभागी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यासारखे आहे. राहुल गांधी बिनकामाचे आहेत आता ते काँग्रेस सांभाळू शकत नाहीत असेच सामना ला  सुचवायचे असावे.