सिंधुदुर्गात लॉकडाऊनचा उपयोग शून्य

कोविडच्या उपाय योजना कागदावरच

होम कोरंटाईन बंद होणे गरजेचे

शून्यप्रहर । हेमंतकुमार कुलकर्णी

कोविडची दुसरी लाट आल्यावर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन ची घोषणा केली. आठ एप्रिल रोजी लॉकडाऊन सुरू झाले. तर याच लॉकडाऊनचा 13 एप्रिल रोजी नवीन आदेश आला.आता १ मे ला सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मात्र लॉकडाऊन सुरू होऊन आज आठवडा उलटून गेला तरी त्याचा उपयोग शून्य दिसू लागला आहे. व्यापाऱ्यांचे, अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान झाले आहे. मात्र लॉकडाऊन चा फायदा कोरोना कमी होण्यासाठी झाला नाही.

याला कारण एक तर सध्याचे लॉकडाऊन म्हणजे संभ्रम निर्माण करणारे आहे. शिवाय हे लॉकडाऊन केवळ मुंबई पुण्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी कोविड नियंत्रणासाठी आहे. ग्रामीण भागात याचा फारसा फायदा नाही. सिंधुदुर्गमध्ये या लॉकडाऊन चा फारसा फायदा झाला नाही याला कारण कोविडसाठी घोषणा करण्यात आलेले सर्व उपाय कागदावरच ठेवण्यात आले.

कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये ग्रामीण भागामध्ये परगावातून कोण आल्यास त्यांच्या व्यवस्थेसाठी ग्राम समिती, वार्ड समिती यांचे नियोजन झाले होते. सिंधुदुर्गात या नियोजनाची घोषणा काल 16 एप्रिल रोजी करण्यात आली. तोपर्यंत कोविड मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

पालक मंत्र्यांनीच सिंधुदुर्गमध्ये कोविडची साथ कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याचे म्हटले. याचा अर्थ त्यांनी सुचवलेल्या अथवा निर्णय घेतलेल्या घोषणा प्रत्यक्षात आल्या नाहीत. यामध्ये प्रामुख्याने सीसीसी म्हणजेच कोविड केअर सेंटर निर्माण करणे याचा समावेश होतो.

होम कोरंटाईन बंद करून इन्स्टिट्यूशन कोरंटाईन सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते मात्र ते झाले नाहीत. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील उदाहरण घेतल्यास या तालुक्यामध्ये केवळ वीस रुग्णांची केअर सेंटर मध्ये होईल एवढीच सुविधा निर्माण झाली आहे.

वास्तविक देवगड मध्ये सध्या सुमारे 250 पेशंट कोविडने ग्रस्त आहेत. या सर्वांसाठी सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र पालकमंत्र्यांचा बोल घेवडेपणा नडला, ते केवळ घोषणा करून मोकळे झाले व संस्थात्मक अलगीकरण्याची सुविधा निर्माण झाली नाही.

संस्थात्मक अलगीकरण झाले नाही याची कबुलीही त्यांनी अलीकडच्या पत्रकार परिषदेत देऊन टाकली. मात्र का झाली नाही याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. यावरून कोविड झालेल्या रुग्णाला सरकारनेच वाऱ्यावर सोडले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो या गंभीर परिस्थितीला सरकारच जबाबदार आहे.

ज्यावेळी कोविडची दुसरी लाट आली त्यावेळी सरकार जागे झाले. कोविड एक वर्ष जुना झाला मात्र, या एक वर्षाच्या कालावधीत कोविडचा सामना करण्यासाठी उभी होणारी यंत्रणा निर्माण करता आली नाही.

मुख्यमंत्र्यांची तथाकथित टास्क फोर्स काय करत होती? नक्की यातील अधिकारी तज्ञ आहेत ना? असे प्रश्न निर्माण होतात. त्यानीं दिलेला सल्ला राज्यकर्त्यांनी का मानला नाही? असाही प्रश्न निर्माण होतो. कोविड हा संसर्गजन्य रोग आहे. ज्याला कोविड झाला आहे त्याला दुसऱ्या माणसाच्या संपर्कात येऊ न देणे हा साधा उपाय जर असेल तर, होम कोरंटाईन बंद करून टाकणे हा सर्वात साधा सोपा उपाय आहे.

कोविडची पहिली सुरुवात याच उपायाने रोखली होते. मात्र सिंधुदुर्गात कोविडची साथ रोखली न जाणे हे प्रशासनाचे अपयश आहेच, शिवाय ते पालकमंत्र्यांचे ही अपयश आहे. हे अपयश पालक मंत्री मिरवत आहेत. हे सिंधुदुर्गातील जनतेचे फार मोठे दुर्दैव आहे.