कशेडी घाटात दुचाकी एसटीवर धडकून दुचाकी स्वाराचा अंत; अन्य २ जण गंभीर जखमी

खेड । प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील हॉटेल अनुसया नजीक गुहागर मुंबई ही एस टी बस व दुचाकी यांच्यात मंगळवारी रात्री ११.३० वा. च्या सुमारास समोरासमोर झालेल्या अपघातात तालुक्यातील चोरवणे उतेकर वाडी येथील विजय प्रकाश जाधव या २१ वर्षीय दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी वरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले

रोहन गंगाराम जाधव (२०, रा भरणे), तुषार दीपक जाधव (२१, रा चोरवणे उतेकर वाडी) असे त्या जखमी झालेल्या दुचाकी वरील दोघांची नावे आहेत. मृत दुचाकीस्वार विजय जाधव हा आपल्या ताब्यातील असलेल्या दुचाकीवर वरील दोघांना घेऊन महाडहुन खेडच्या दिशेने येत होता. तर एसटी बस चालक दत्ताराम महाडिक हे आपल्या ताब्यातील गुहागर मुंबई ही बस मुंबईकडे घेऊन जात असताना कशेडी घाटातील हॉटेल अनुसया नजीकच्या तीव्र उतारात दुचाकीस्वार विजय जाधव याने बसला समोरा समोर धडक देऊन अपघात केला. यामध्ये त्याचा जागीच अंत झाला. तर दुचाकी वर त्याच्या मागे बसलेले दोघे गंभीर जखमी झाले.

दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच येथील पोलीस स्थानकाचे सहा पोलीस उप नि कदम, कशेडी टॅप चे बोडकर, समेल सुर्वे, दाभोळकर, जाधव , चिकणे, यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच देवदूत टीम चे मुकुंद मोरे , महेश रांगडे, सहदेव कदम यांनी मदत कार्य करत स्वामी नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेने जखमींना कळबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

जाहिरात4