भाजप प्रिमियम लीग “छत्रपती शिवाजी महाराज चषक” क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ

जाहिरात-2

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते उद्घाटन : तुळस जिल्हा परिषद गट भाजपचे भव्य आयोजन

वेंगुर्ला|प्रतिनिधी
तुळस भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या संधीचे प्रत्येक खेळाडूने सोने करून आपल्या जिल्ह्याचे व देशाचे नावलौकिक करा. पुढील काळात भाजपच्या वतीने जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन आम्ही देशाला दर्जेदार खेळाडू देऊ. कोणत्याही खेळावर निष्ठा असल्यानंतर यश हे निश्चित मिळते. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ला- पेंडूर येथे केले.

तुळस जिल्हा परिषद गट भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तुळस जिल्हापरिषद मतदार संघातील तुळस, मातोंड, पेंडुर, होडावडा, पाल, वजराठ या सहा गावांची एकत्रित क्रिकेट स्पर्धा भाजपा प्रीमियर लीग २०२१ म्हणजेच “श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक” स्पर्धेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्री गणेश, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मैदानात श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला. यावेळी निरवडे सरपंच प्रमोद गावडे, शक्तीकेंद्र प्रमुख तथा मातोंड सोसायटी चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, संतोष शेटकर, पेंडूर माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य संतोष गावडे, तुळस सरपंच शंकर घारे, पेंडूर उपसरपंच प्रमोद शिरोडकर, मातोंड सोसायटी संचालक किशोर परब, अनिल परब, ताता मेस्त्री, संघमालक कमलेश गावडे, महेश वडाचेपाटकर, नितीन चव्हाण, सुभाष सावंत, नारायण नाईक, वजराठ येथील महेश राणे, वजराठ उपसरपंच नितीन परब, वामन भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम मातोंड येथील निवृत्त केंद्रप्रमुख, क्रीडाप्रेमी कै भिकाजी मातोंडकर गुरुजी व पेंडूर येथील शांताराम परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मैदानात सर्व खेळाडूंची ओळख परेड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. दरम्यान या क्रिकेट स्पर्धेचे प्रथम यजमान पद हे पेंडूर गावला मिळाले असून येथील महापुरुष मैदान पेंडूर- नेवाळेवाडी येथे ही स्पर्धा आजपासून २३, २४ व २५ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रक्कम ३० हजार २१ रुपये व आकर्षक चषक कै. उमेश परब, माजी सरपंच मातोंड यांच्या स्मरणार्थ तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम २० हजार २१ व आकर्षक चषक कै सुनील तुळसकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. तसेच इतर वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहे. तर २५ फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ आमदार नितेश राणे, जि प अध्यक्ष समिधा नाईक, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला आहे. यात मनिष दळवी व तुळस सरपंच शंकर घारे यांचा क्षेत्रपालेश्वर स्पोर्ट्स, पाल येथील भाजप पदाधिकारी कमलेश गावडे यांचा खाजणादेवी, भूमिका स्पोर्ट्स पाल, तुळस येथील राकेश तांडेल व अनंत रायकर यांचा एम एस आर टी तुळस, वजराठ भाजप पदाधिकारी नितीन चव्हाण यांचा गिरेश्वर इलेव्हन वजराठ, मातोंड माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुभाष सावंत यांचा फ्रेंडशिप रायडर्स मातोंड, महेश वडाचेपाटकर यांचा सातेरी स्पोर्ट्स मातोंड, पेंडूर येथील नारायण नाईक यांचा भद्रकाली- घोडेमुख पेंडूर व पेंडूर येथील भाजप पदाधिकारी तथा ग्रा प सदस्य संतोष गावडे यांचा कुलदेवता घोडेमुख या संघांनी सहभाग घेतला आहे.

जाहिरात4