तवसाळ अगर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला जीवदान

जाहिरात-2

गुहागर | प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव म्हणजे तवसाळ आगर!

या समुद्रकिनारी वसलेल्या तवसाळ आगरमधे वास्तव्यास असणारे पाटील कुटुंबातील अवधूत पाटील आणि त्यांचा पुतण्या विक्रांत पाटील हे दोघे नियमीतपणे उदर निर्वाहासाठी बिगर यांत्रिकी होडीतुन मच्छिमारी करतात. मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यामध्ये भेटलेले मासे काढण्याकरता जाळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर जाळ्यामध्ये मोठा मासा सापडल्याचे त्यांना जाणवले. मात्र प्रत्यक्षात ते भलेमोठे ऑलिव्ह रिडले जातीचे कासव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कासव अडकल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील काका-पुतण्याने स्वतःचे किमती जाळे कापून त्या ऑलिव्ह रिडले जातीच्या भल्यामोठ्या कासवांची जाळ्यातून मुक्त करून त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिले. याबाबतची माहिती घेताना अवधूत पाटील यांनी सांगितले की अशाप्रकारे माशांसाठी टाकलेल्या जाळ्यात कासव अडकण्याचा, गुरफटण्याचा हा आठवडाभरातील तिसरा प्रकार आहे. सध्याचा हा हंगाम आमच्या अनुभवानुसार कासवांची अंडी घालण्याचा असल्याने अंडी घालण्याकरता आलेल्या मादी कासव या जाळ्यात अडकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. तवसाळ समुद्रकिनारी सात ते आठ ठिकाणी कासवांची अंडी मिळाली असल्याने हे ही कासव अंडी घालण्यासाठीच आसरा घेत असल्याचा संभव असून आम्ही किमती जाळ्यांची पर्वा न करता त्या कासवाला पाण्यातल्या पाण्यातच जाळ्यातून सोडवून पुन्हा समुद्रात सोडून दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

शासन स्तरावरून व अनेक संस्थांमधून कासवांचे,कासवांच्या अंड्यांचे संवर्धन, जोपासना होत असताना पाटील कुटुंबीयांनी जाळ्यात अडकलेल्या कासवाला दिलेल्या जीवदानाबद्दल सर्व कासव प्रेमी व पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.

संबंधित कासवाची जाळ्यातुन सुटका करत असताना पाटील यांच्या मासेमारी जाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.”दुर्मिळ माशांच्या प्रजातींचे रक्षण” करतना नुकसान झाल्यास संबधिताना त्याची नुकसान मिळण्याची महाराष्ट्र शासन मत्स्य विभागाची योजना आहे.त्यानुसार अवधुत पाटील यानी.सहा.मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी) गुहागर मान.देसाई यांच्याकडे संपर्क साधला आहे.याबाबत सर्व कागदपत्रे व परीस्थीतीजन्य पुराव्यांची पडताळणी करुन पाटील यांच्या नुकसान भरपाई संदर्भातला प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याचे सांगितले आहे.

जाहिरात4