कवी केशवसुत स्मारक साहित्य प्रेमींसाठी प्रेरणादायी – निवृत्त एअर मार्शल भुषण गोखले

जाहिरात-2

खंडाळा | वार्ताहर 

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वातील आद्यकवी कवी केशवसुत यांच्या जन्मगावी साकारलेले कवी केशवसुत स्मारक हे मराठी साहित्य, मराठी भाषा आणि मराठी साहित्यिक याबद्दल जवळीक साधणाऱ्या साहित्यप्रेमीसाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार भारताच्या सशस्त्र सेनेच्या वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी काढले.

त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत नुकतीच रत्नागिरी तालुक्यातील कवी केशवसुत स्मारकाला भेट दिली. लहानपणापासूनच साहित्य क्षेत्राचा सहवास लाभल्याने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी साहित्य क्षेत्रातील साहित्यिकांबद्दलचा आदर कवी केशवसुत स्मारकाला भेट दिल्यानंतर दुणावल्याची जाणीव झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कवी केशवसुत स्मारकामधील कवी केशवसुतांचे जन्मघर, आधुनिक काव्यदालन, रंगमंच, वाचनालय यासह स्मारकातील विविध दालनाना भेट देत समाधान व्यक्त करतानाच कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या मदतीने कवी केशवसुत स्मारक जतन करण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून येणाऱ्या पिढीसाठी हे स्मारक उत्तुंग प्रेरणा ठरण्याचा आशावाद व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी कवी केशवसुत स्मारकाला रोख स्वरूपात देणगी जाहीर केली.

यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय, जिंदाल उद्योगसमूहाचे माजी जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये होते. तर कवी केशवसुत स्मारकाच्या वतीने त्यांचे कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर यांनी केले. यावेळी कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे सदस्य शरद बोरकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेंद्र शिंदे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अरुण मोर्ये, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडचे सचिव उमेश भणसारी, खजिनदार विद्याधर तांदळे, कार्यकारिणी सदस्य रामानंद लिमये, ग्रंथपाल श्रुती केळकर, माधव अंकलगे यांच्यासह कवी केशवसुत स्मारक व्यस्थापन समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात4