फोंडाघाट येथे कातकरी समाजातील महिलेसह चार जणांना वन कर्मचार्यांची मारहाण

जाहिरात-2

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत व मारहाणीचा गुन्हा दाखल

संतोष राऊळ | कणकवली :
फोंडाघाट येथील कातकरी समाजातील महिलेसह अन्य लोकांना मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट वनविभागाच्या पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या वन कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, या घटनेबाबत मारहाण झालेली महिला सखु बारक्या पवार (वय ​४५, फोंडाघाट) यांनी कणकवली पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाच वन कर्मचाऱ्यांच्या विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ​१९८९ च्या कलमान्वये व भादवि कलम ​३२४ ​५०४ व ​३४ अन्वये कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मारहाण झालेली महिला सखु बारक्या पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सखू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, फिर्यादीच्या नवऱ्याच्या गालास धावऱ्याचा आजार झाल्याने औषध शोधण्यासाठी फिर्यादी व तिचा मुलगा व भाचा ​१८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता फोंडाघाट येथील जंगलात गेले होते. ही औषधे शोधल्यानंतर एक औषध मिळाले नसल्याने त्या औषधाची शोधाशोध करत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे साटम व अन्य कर्मचारी जंगलाच्या ठिकाणी आले. वन कर्मचाऱ्यांना पाहून फिर्यादीचा नवरा व मुले जंगलातून पळून गेली. त्यावेळी वन कर्मचाऱ्याने बाकीचे कशाला पळाले असे विचारले असता, फिर्यादीने तुम्हाला घाबरून व जिवाला घाबरून पळाले असे सांगितले. मात्र यावेळी संशयित साटम, कुबल यांनी आपल्या कार्यालयातील आणि लोकांना बोलावून घेत फिर्यादीला दांड्याने मारहाण केली. व फिर्यादी महिलेला फोंडाघाट वनविभागाच्या कार्यालयात आणत तेथेही कर्मचाऱ्यांनी दांड्याने मारहाण केली. व त्यानंतर फिर्यादीला घरी जाण्यास सांगत दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात असलेल्या चौघांनीही फोंडाघाट वनविभागाच्या कार्यालयात येण्यास सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

​१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ​८ वाजता वनकर्मचारी कुबल व त्यांच्यासोबत एक जण त्यांच्या घरी जात फीर्यादीच्या नवर्‍याला तू आमच्यासोबत चल असे सांगितले. मात्र आम्ही चौघे येणार असे सांगितल्यानंतर त्यांनी रिक्षा बोलावून घेत फिर्यादिसह चौघांना रिक्षात बसवून कार्यालयात आणले. व तेथेही चौघांना मारहाण केली. व कागदावर काहीतरी लिहून आमचे अंगठे घेतले. व त्यानंतर आम्हाला घरी सोडून पुन्हा उद्या सकाळी या असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र ​२० फेब्रुवारी रोजी आम्ही वन कार्यालयात न जाता आम्ही कातकरी संघटनेच्या अधिकाऱ्यांना व वकील ऍड. सुदीप कांबळे यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर ऍड. कांबळे व अखंडलोक म्हणजे अध्यक्ष नामानंद मोडक हे फिर्यादीच्या घरी गेले. व तेथून ​ त्यांनी फोंडाघाट वन विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेत त्यानंतर फिर्यादीला घेऊन ते कणकवली पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या समक्ष मारहाण झालेल्या या कातकरी समाजातील लोकांचे जबाब घेण्यात आले. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

जाहिरात4