अठरा हजार वर्षांपूर्वीच्या शंखाच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण

जाहिरात-2

पॅरिस : सन 1931 मध्ये संशोधकांना पाइरेनीस पर्वतराजीतील एका गुहेत अतिशय मोठ्या आकाराचा शंख आढळून आला होता. त्याचा आवाज कसा आहे हे लोकांना समजावे यासाठी त्याच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण करून ते प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा शंख तब्बल अठरा हजार वर्षांपूर्वीचा असून त्याचा एक वाद्य म्हणूनच वापर केला जात होता असे दिसून आले आहे. हा शंख बारा इंचांचा आहे.

या सागरी शंखाचे मुख तुटलेले असून ते 1.4 इंच व्यासाचे आहे. एखाद्या शंखाचा हा सर्वात कठीण भाग असतो. त्यामुळे तो चुकून तुटलेला नसून वाद्यस्वरूपात त्याचा वापर करण्यासाठी तोडलेला असावा असे दिसते. आता फ्रान्सच्या नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या संशोधकांनी त्याच्या आवाजाचा ऑडिओ प्रसिद्ध केला आहे. या शंखाला नीट कापण्यात आले होते तसेच लाल रंगाच्या हेमाटाईटने सजवण्यातही आले होते. त्यावर एक ऑर्गेनिक कोटिंगही आहे. त्यावरून असे दिसते की त्याच्या पुढे एखादा माऊथपीसही लावला गेला असावा. कार्बन डेटिंगच्या आधारे हा शंख 18 हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसून आले. त्यावरून असे दिसते की हे अशा पद्धतीचे सर्वात जुने वाद्ययंत्र आहे. अटलांटिक महासागराचा किनारा व पाइरेनीसच्या दरम्यान राहत असलेल्या भटक्या लोकांकडून त्याचा वापर केला जात असावा. शिकारीसाठी हे लोक सतत जागा बदलत असत.

जाहिरात4