अभिनेता राजीव कपूर यांचे आकस्मिक निधन

जाहिरात-2

मुंबई : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी येत आहे. कपूर घराण्यातील ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर (Rajeev Kapoor) यांचं निधन झालं आहे. राजीव कपूर हे ५८ वर्षांचे होते. ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. चेंबूर येथील इंलॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं. राम तेरी गंगा मैली, एक जान है हम हे त्यांचे गाजलेले सिनेमे.

गेल्यावर्षी निधन झालेल्या ऋषी कपूर यांच्या कुटुंबाला मंगळवारी आणखी एक धक्का बसला. मंगळवारी सकाळी राजीव कपूर यांचा दिवस खूप चांगला सुरू झाला. मात्र नाष्टा झाल्यानंतर त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं. कुणाला सांगेपर्यंत त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

रणधीर कपूर यांनी खूप धक्क्यात असताना ही माहिती दिली. ‘मी माझा सर्वात लहान भाऊ राजीवला गमावलं आहे. डॉक्टरांनी खूप मेहनत केली पण त्यांना वाचवू शकले नाहीत.’

नीतू कपूरने इंस्टाग्रामवर राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. सिनेसृष्टीतून शोककळा पसरली आहे. कपूर कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का आहे. गेल्यावर्षी ऋषी कपूर यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे.

जाहिरात4