शृंगारतळीत लाईफकेअर हॉस्पिटलच्या उप-आरोग्य केंद्राचे उद्घाटन

  • चिपळूणातील नामवंत डॉक्टरांची विशेष उपस्थिती
  • मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाटपन्हाळे | वार्ताहर

चिपळूण येथील लाईफकेअर हॉस्पिटल आणि शृंगारतळी येथील फ्लाईट एज्युकेशनल आणि चॅरिटेबल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शृंगारतळी येथे लाईफकेअर हॉस्पिटलचे उप आरोग्य केंद्राचे उद्घाटन येथील सामाजिक कार्यकर्ते गुलामभाई तांडेल यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्रख्यात डॉक्टर इसहाक खतीब, डॉ.समीर दळवी, डॉ.विष्णू माधव, डॉ. हुजैफा खान, डॉ.नदीम खतीब, डॉ.आयशा खान, डॉ.पिरजादे, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार, निसारखान सरगुरो, अजित बेलवलकर, हुसैन बोट, साबीर साल्हे, डॉ.काझी, रियाज ठाकूर यांच्यासह फ्लाईट एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्टचे श्री.शब्बीर बोट आणि प्रा.जहूर बोट उपस्थित होते.

शब्बीर बोट आणि प्रा.जहूर बोट यांनी गुहागर तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन गुहागर तालुक्यातील शृंगारतळी सारख्या शहरात आरोग्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला व लाईफकेअर हॉस्पिटल आणि फ्लाईट एज्युकेशनल आणि चॅरिटेबल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शृंगारतळी येथे लाईफकेअर हॉस्पिटलचे उप आरोग्य केंद्र १ फेब्रुवारी पासून शृंगारतळी बाजारपेठेतील तोहिद मॉलच्या पहिल्या मजल्यावर सुरू झाले आहे. याठिकाणी दर शनिवारी जनरल व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.हुजैफा खान आणि हृदय व मधुमेह तज्ञ डॉ.आयशा खान हे सकाळी १० ते दुपारी २ वा.पर्यंत उपकेंद्रामध्ये उपस्थित राहून रूग्णांवर उपचार करणार आहेत. तसेच लाईफकेअर हॉस्पिटलने कायमस्वरुपी लॅबोरेटरी सुरू केली आहे. लाईफ केअरच्या उप-आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री.शब्बीर बोट आणि प्रा.जहूर बोट यांनी सत्कार केला.

या उप-आरोग्य केंद्राच्या उद्घाटनानंतर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा लाभ तालुक्यातील अनेक रूग्णांनी घेतला. हे उप-आरोग्य केंद्र सुरू झाल्याने गुहागरच्या जनतेला आरोग्यबाबत मोठा लाभ होणार आहे. या उप-आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर इसहाक खतीब यांनी फ्लाईट एज्युकेशनल आणि चॅरिटेबल संस्थेच्या श्री.शब्बीर बोट आणि प्रा.जहूर बोट यांचे कौतुक केले.

जाहिरात4