ग्रीन रिफायनरीला वाढते समर्थन!

दै. प्रहारचे कार्यकारी संपादक माधव कदम यांचे विशेष संपादकीय..

उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीच्या पिंजऱ्यातुन बाहेर येऊन रखडलेला रिफायनरी प्रकल्प आता मार्गी लावावा
खा. विनायक राऊत यांचा विरोध आणि विधाने हास्यास्पद, पुर्वग्रहदुषीत व अज्ञानातुन
देशाला आथिक स्थैर्य अन् लाखोंना रोजगार देणारा कोकण विकासाचा मानबिंदू ठरणारा प्रकल्प नाकारण्याचा नतद्रष्टेपणा शिवसेनेने सोडावा.
कोकणच्या सर्वांगिण विकासाचा मानबिंदू ठरणारा रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प नाणार येथेच व्हावा. राज्य सरकाराने त्यास तात्काळ मंजूरी देऊन या प्रकल्पाची रद्द केलेली अधिसूचना पुन्हा काढावी आणि या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी राजापूर तालुका परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रातील ४५ संस्था व संघटनांनी या प्रकल्पाला समर्थन दिले आहे. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी पुढे सरसावलेल्या सर्व संस्थांमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांच्या बरोबरच वकिल, डॉक्टर, प्रेस क्लब, व्यापारी संघटना, मच्छीमार, हॉटेल, रिक्षा व्यावसायिक आदी समाजातील सर्वच स्तरातील संस्थांचा समावेश आहे.
यापुर्वी हा प्रकल्प नाणार येथेच व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, देवगड पंचायत समिती तसेच राजापूर तालुका व्यापारी संघ, वकिल संघटना आदी विविध संघटनांनी ठरावही केलेले आहेत. प्रकल्पाला कोकण वासीयांचा मिळत असलेला वाढता पाठींबा याचा विचार आता राज्यातील उध्दव ठाकरे सरकारने गांभीर्याने करणेची गरज आहे. यापुर्वी काही तथाकथीत, भंपक आणि अज्ञानी पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पामुळे प्रदूषण मोठया प्रमाणावर होऊन आंबा, बागायती आणि मासेमारी नष्ट होणार असल्याची भिती दाखवून प्रकल्पाला विरोध करण्यास लावला होता. मात्र आता कोकण वासीयांच्या ही फसवणूक व दिशाभुल लक्षात आली आहे. विविध क्षेत्रातील अभ्यासू मान्यवर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, संशोधक, रसायन तंत्रज्ञान तज्ञ, अर्थक्षेत्रातील तज्ञ आदी अनेक मान्यवरांनी या प्रकल्पामुळे असलेले फायदे तसेच या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, कोकणातील पर्यावरणाला तसेच कोकणातील फळफळावळ व मासेमारीला कोणताही धोका नाही याचा खुले आम निर्वाळा दिल्याने त्या दृष्टीने कोकण वासीयांची आता खात्री पटल्याने आता या प्रकल्पाला असलेला विरोध संपला आहे. या प्रकल्पाला आता मोठया प्रमाणावर पाठींबा व समर्थन मिळत आहे. असे असतानाही कोकणचा सर्वार्थाने कायापालट करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प होऊ नये यासाठी त्यात खोडा घालण्याचा भंपक नतद्रष्टेपणा केवळ शिवसेनेचे खा. राऊत हेच करत आहेत. खा. राऊत यांचा या प्रकल्पाला असलेला विरोध कोकणत्याही तात्वीक मुद्दयावर नाही. केवळ स्वत:चा व्यक्तीगत पुर्वग्रह दुषीतपणातुन तसेच अहंपणातुन आणि हेकेखोरपणा व अज्ञानातुन ते विरोध करत आहेत. हे उघडपणे दिसत आहे. आता तर त्यांनी हा प्रकल्प गुहागर किंवा रायगड मध्ये प्रस्तावित असल्याचे केलेले विधान हे हास्यास्पदच आहे. तीथेही त्यांचे अज्ञानच प्रगट होते. याचे कारण या पुर्वी शिवसेनेचेच माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी गुहागरमध्ये प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न केले होते, परंतु तेथे प्रकल्पासाठी आवश्यक तेवढी जमिन व अन्य सुविधा नसल्याने त्यावेळी स्पष्ट झालेले आहे. रायगड मध्येही हा प्रकल्प उभारणे अशक्य असल्याचे यापुर्वीच उघड झालेले आहे. यामुळे नाणार परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला, नाणार येथे हा प्रकल्प उभारणे सोयीचे असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केल्यानंतरच नाणार येथे प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली होती. आता तर स्थानिक जनतेचा विरोधही मावळला असून प्रकल्पबाधित क्षेत्रातील सर्व गावातील जमिनधारकांनी आपली जमिन या प्रकल्पाला देण्यासाठी सहमती तसेच प्रकल्पाला समर्थन यापुर्वीच जाहिर केले आहे. तशा प्रकारची संमतीपत्रे व प्रकल्प याच नाणार परिसरात व्हावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक आ. राजन साळवी यांची प्रकल्पबाधित गावांतील जमिन मालकांनी भेट घेतली. त्यानंतर आ. राजन साळवी यांनी प्रकल्प ग्रस्तांचा पाठींंबा असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना सांगितल्याचे जाहिर केले आहे.
गेले वर्षभरातील कोरोना महामारीच्या संकटामुळे संपुर्ण देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. कोटयावधी लोक नोकऱ्या व रोजगार गेल्याने बेकार झालेले आहेत. लाखो बेकार तरूण रोजगार व नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. म्हणूनच राज्यालाच नव्हे तर देशालाही आर्थिक स्थैर्य व लाखोंंना रोजगार देणारा व कोकणच्या सर्वांगिण विकासात महत्वपुर्ण भुमिका बजावण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प आता मार्गी लागलाच पाहिजे. म्हणूनच खा. राऊत यांच्यासारख्या या प्रकल्पाच्या बाबतीत पुर्णता अज्ञानातुन विरोध करणाऱ्यांचे न ऐकता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकणातील सर्वांनाच हवा असलेला हा प्रकल्प नाणार परिसरातच उभारावा. ही कोकण वासीयांची हाक मातोश्रीच्या पिंजऱ्यातुन बाहेर येऊन ऐकावी आणि रखडलेला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प आता तात्काळ मार्गी लावावा अशी कोकण वासीयांची अपेक्षा आहे.
———————————————-