कांदळवन संरक्षणासोबत उपलब्ध होत आहेत उपजीविकेच्या नवनवीन संधी : वीरेंद्र तिवारी

रत्नागिरी । प्रतिनिधी

कांदळवन कक्ष वनविभाग महाराष्ट्र शासन आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली कांदळवन सरंक्षण व उपजीविका निर्माण योजनेच्या विविध प्रकल्पाना कांदळवन कक्ष, मुंबईचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दोन दिवसांचा दौरा करून भेट दिली आणि माहिती घेतली. तसेच मार्गदर्शन केले.

या भेटी दरम्यान उपवनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, प्रादेशिक वनाधिकारी, रत्नागिरी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी सचिन निलख, उपसंचालक उपजीविका प्रकल्प कांदळवन प्रतिष्ठान डॉ सुशांत सनये, उपसंचालक प्रकल्प, कांदळवन प्रतिष्ठान डॉ शीतल पाचपांडे, वनक्षेत्रपाल अधिकारी कांदळवन कक्ष रत्नागिरी राजेंद्र पाटील, वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्रीमती प्रियंका लगड, वनक्षेत्रपाल दापोली वैभव बोराटे, उपजीविका तज्ञ कांदळवन प्रतिष्ठान वैभव बोमले यांनी विविध प्रकल्पांना भेट दिली.

दौऱ्याची सुरवात ही सोनगाव, खेड येथील पर्यटन प्रकल्पास भेट देऊन करण्यात आली. यावेळी पदाधिकऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचं निराकरण लवकरच करू असे आश्वासन दिले. सदर दौरया दरम्यान परटवणे मत्स्य नर्सरी, मिऱ्या कांदळवन रोपवन, आरे कांदळवन रोपवाटिका क्षेत्रास भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेण्यात आला . तसेच कांदळ उपजिवीका निर्माण योजनेअंतर्गत चालू खेकडा पालन प्रकल्प मौजे राई, मौजे जानशी येथे पाहणी केली. गावखडी येथील कासव संवर्धन केंद्रास भेट देऊन कामाचा आढावा घेण्यात आला. दौरयाच्या शेवटी सागवे येथील पिंजऱ्यातील मत्स्यपालन आणि शोभिवंत मत्स्यशेती प्रकल्प भेट दिली.

सर्व अधिकारी वर्गाने लाभार्थी गटाशी संवाद साधून प्रकल्पाच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. श्री वीरेंद्र तिवारी यानी योजनेच्या कामाबद्दल शुभेच्छा देऊन त्यातून अनेक लोकांना उपजीविकेचे उत्तम साधन उपलब्ध होईल आणि सोबत कांदळवनाचे महत्व लोकांना कळेल अशी आशा व्यक्त केली. सदर चा दौरा यशस्वी होण्यासाठी कांदळवन प्रतिष्ठान प्रकल्प समन्वयक, वनविभागाचे सचिव, लाभार्थी गावांतील समितीचे अध्यक्ष यांनी विशेष नियोजन केले.

जाहिरात4