रत्नागिरी Breaking : एसटी विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या चालकाची प्रकृती बिघडली

रत्नागिरी । प्रतिनिधी

वडील आजारी असल्याने कामगिरीवर काढू नका अशी विनंती करणाऱ्या चालकाच्या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी त्याचे थेट निलंबन करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध उपोषणाला बसलेल्या चालकाची प्रकृती मंगळवारी रात्री बिघडली. त्यांना जिल्हा रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे.श्री. ठाकुरदेसाई यांच्या प्रकृतीची जबाबदारी आता विभाग नियंत्रक घेणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मालवाहतूक ट्रकवर सेवेवर जाण्यास नकार नाही, परंतु वडिल आजारी असल्याने या कामगिरीवर काढू नये, असे पत्र चालक संतोष ठाकुरदेसाई यांनी एस. टी. प्रशासनाला दिले होते. त्यांच्या या पत्रावर सहानुभूतीपूर्वक विचार होणे अपेक्षित होते. मात्र असे न होता ठाकुरदेसाई यांना कोणतेही कारण न देता रत्नागिरीच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापकांनी निलंबित केले.

यापूर्वी अनेकांना पाठीशी घालणाऱ्या या प्रशासनाविरोधात संतोष ठाकुरदेसाई यांनी सोमवारपासून माळनाका येथील एसटी आगाराबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात त्यांनी एसटीच्या मुंबई प्रदेश व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस दिली आहे.

विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्यासमवेत त्यांनी सोमवारी सायंकाळी चर्चा केली. मात्र श्री. भोकरे यांनी गांभीर्याने याकडे लक्ष न दिल्याने ठाकुरदेसाई यांचे मंगळवारीही उपोषण सुरूच होते.

मात्र सध्या कडाक्याची थंडी पडली असून त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा ठाकुरदेसाई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाकुरदेसाई यांच्या या परिस्थितीची जबाबदारी आता विभागनियंत्रक घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे. तर एस टी व्यवस्थापनाविरोधात आता एस टी चालक वाहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

जाहिरात4