चिपी विमानतळ अन् शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…!

माझे कोकण | संतोष वायंगणकर
कोकणामध्ये कोणताही प्रकल्प उभा रहायचा असेल किंवा होत असेल तर ‘त्या’ प्रकल्पाबाबत एकमत झाले असे कधीच घडलेले नाही. कोणत्याही प्रकल्पाच्या बाबतीतली विरोधाची कारणे कोणतीही आणि काहीही असू शकतात. १९९० नंतर तर कोकणच्या राजकारणात राणे यांची झालेली ‘एन्ट्री’ त्यापासून आजपर्यंत नेहमीच फक्त राणेंना विरोध हाच प्रकल्पांना विरोध होत राहिला. अर्थात खा. नारायण राणे यांच्या महाराष्टÑातील राजकिय आगमनापूर्वीही काँग्रेस पक्ष, आणि समाजवादी यांच्यातही वाद आणि विरोध हे होतेच ! फक्त त्याचे स्वरूप वेगळे होते.

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय वादाला माजी मंत्री अ‍ॅड. एस.एन.देसाई आणि माजी मंत्री भाईसाहेब सावंत असा सुप्त असलेला राजकिय संघर्ष मुख्यालय वादात उघड झाला. अर्थात या सुप्त संघर्षाचे ‘मुळ’ हे काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले या महाराष्टÑातील दोन गटापाशी होते. त्यामुळे कोकणातील राजकारणातील संघर्ष हा काही नवीन नाही. ‘तो’ फार जुना आहे. कै. श्यामराव पेजे व कोकण नेते कै. पी.के.उर्फ बाळासाहेब सावंत यांच्यापासूनचा आहे.

हा सुप्त वाटणारा राजकिय संघर्ष कधी उघड तर कधी-कधी कुणालाच काही कळलं नाही. मात्र, कुरघोड्या होतच राहिल्या. यात कधी प्रकल्प किंवा कशावरूनही वाद आणि संघर्ष कोकणात होऊ शकतात. त्या अर्थाने कोकणची ही भूमी नेहमीच चिकित्सक आणि विकासापेक्षा वादाला महत्व देणारी ठरली आहे. सध्या कोकणात आणि महाराष्टÑात भाजपाचे आ. नितेश राणे यांच्या एक ‘टिविट्’ ने चर्चेला आणि मतमतांतरांना उधाण आले आहे. चिपी येथील विमानतळाला हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असे सुचित करण्यात आले आहे. कोकण आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वेगळंच नाते राहिले आहे.

शिवसेना प्रमुखांनी आपल्या जाज्वल्य विचारांनी अनेक शिवसैनिक घडविले. याच शिवसैनिकातून अनेक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री झाले. यातलेच एक स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक खा. नारायण राणे होत. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनीच चिपी येथे आंतरराष्टÑीय विमानतळ व्हावा यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु चिपीचा हा विमानतळ ‘डोमेस्टीक’ विमानतळ करण्यात येत आहे. या चिपी विमानतळाचे उद्घाटनाचे अनेक मुहर्त काढण्यात आले. परंतु ते कधीच सत्यात उतरले नाहीत. आताही असाच जानेवारीतला मुहर्त सांगितला जात आहे.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिपी विमानतळाला नाव देणे उचित आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सुचविल्यावरून शिवसेनेच्या निष्ठा, गद्दार यावर आ. वैभव नाईक यांनी भाष्य केले आहे. खरंतर आज कोणत्याच पक्षात पक्षनिष्ठेने बांधलेले कार्यकर्ते किती आहेत हे शोधावे लागतील. शिवसेनेत तर कडवट असलेले शिवसैनिक उपरे ठरले आहेत. आणि काँग्रेसी विचारधारेत वाढलेले केवळ सत्तेसाठी गेलेलेच शिवसेनेच्या निष्ठा सांगताना दिसतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांची शिवसेना आज आहे कुठे ? काँग्रेसी विचारधारेत शिवसेनेचा हिंदुत्ववादाचा आणि मराठी अभिमानाचा विचार सत्तेच्या साटमारीत कधीचाच विरळून गेला आहे. शिवसेना या चार अक्षरांनी जोडला गेलेला शिवसैनिक या राजकिय तडजोडीत अस्वस्थ मनाने घुसमटला आहे. परंतु केवळ निष्ठेने ‘तो’ आजही जोडलेला आहे.

यामुळे चिपी विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सुचविण्यात आणि देण्यात काहीच गैर ठरत नाही. कोकणातील जनतेच्या हृदयातील हिंदुहृदय सम्रांटाचे स्थान हे कायमच राहिले आहे. आणि राहणारही आहे. शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेत वाढलेल्या आणि प्रेरित असलेल्या माझ्यासारख्यालाही आणि अखंड कोकणालाही याचा निश्चितच आनंद आणि अभिमानही आहे. बॅ.नाथ पै हे देखिल कोकणवासियांचे दैवतच मानल जाते. परंतु हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासंबंधी कोणतेही वाद, प्रवाद न करता किमान या विषयात तरी सर्वांनी राजकारणापेक्षा एक विचाराने चिपी विमानतळाला नाव दिले जावे. २००० सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणच्या जनतेचे आभार मानण्यासाठी साष्टांग दंडवत घातले होते. त्याच शिवसेनाप्रमुखांचे चिपी विमानतळाला नामकरण करणे अधिक उचित ठरेल !