सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सजग राहणे आवश्यक-संतोष वालावलकर

राजापूर अर्बन बँकेच्या वतीने आयोजित सायबर क्राईम जनजागृती शिबीरात मार्गदर्शन करताना पोलिस उपनिरिक्षक संतोष वालावलकर
राजापूर अर्बन बँकेच्या वतीने सायबर क्राईम जनजागृती शिबीर संपन्न

राजापूर | प्रतिनिधी
आजच्या आधुनिक मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात सायबर गुन्हयांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र याला आळा घालावयाचा असेल तर आपण प्रत्येकाने अधिक सजग आणि सतर्क होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष वालावलकर यांनी येथे केले.

राजापूर अर्बन बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायबर क्राईम जनजागृती शिबीरात ते बोलत होते. बँकेच्या राजापूर शाखेतील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर, संचालक विजय पाध्ये, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, कर्ज वितरण अधिकारी लक्ष्मण म्हात्रे, संगणक विभागाचे प्रमुख प्र्रसन्न खांबे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी वालावलकर यांनी सारबर क्राईम कशा प्रकारे वाढत आहे याबाबत माहिती दिली. सारबर क्राईम करणारी मंडळी मोबाईलवर फोन करून आपल्याशी गोड बोलतात आणि त्यांच्या त्या गोड बोलण्याच्या जाळयात आपण फसतो आणि मग आपण आपली माहिती त्या व्यक्तीशी शेअर करतो. याचा फायदा ही मंडळी उठवतात आणि मग आपण आपली जी ठेव असते ती गमावून बसतो. यासाठी प्रत्येकाने अधिक सतर्क झाले पाहिजे आणि अशा गुन्हयांना रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही वालावलकर यांनी सांगितले. पोलीस यंत्रणा कायमच यासाठी आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी ग्राहकांनी त्यांना येणाऱ्या मोबाईल फोनबाबत अधिक जाागरूक असणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत आपले बॅकिंग डिटेल्स, आपला पिक कोड, आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी कुणालाही सांगता कामा नये. बँकेत ग्राहकांचे पैसे सुरक्षितच असतात, पण ज्या वेळी आपण आपल्याला आलेल्या फोनवर अशा प्रकारे बॅकिंग डिटेल्स, आपला पिक कोड, आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी देतो त्यावेळी मात्र आपण फसतो. यासाठी भविष्यात अधिक सजग रहा असे आवाहन अहिरे यांनी केले.

याप्रसंगी बँकेच्या वतीने वालावलकर तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद वाघाटे यांचा सत्कार करण्यात आला. या शिबीराला राजापूर शहरातील व्यापारी, ग्राहक व बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.