विमान उड्डाणाचे नवे गाजर….!

माझे कोकण | संतोष वायंगणकर
‘बोलणा-याची आंबट बोरंही खपतात आणि न बोलणा-यांचे गोड पेरूही खपत नाहीत’ अशी मराठीत एक म्हण आहे. कोकणातील शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार, खासदार यांची स्थिती ही आंबट बोरं विकणाºयांसारखी आहे. शेतक-यांच्या नुकसान भरपाईचा विषय असेल किंवा चिपी विमानतळाचा विषय, कोकणच्या विकासासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी यासर्वांमध्ये केवळ बोलघेवडेपणाच असल्याचे दिसून आले आहे. कोकणातील शेतक-यांना मोठी नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केली होती. परंतु कोकणातील शेतक-यांना कोणतीही भरीव आर्थिक तरतुद करण्यात आलेली नाही. परंतु एक फारच गंमत आहे. कोट्यावधी रूपये देण्याच्या घोषणा करण्यात येत होत्या. कोकणात आजवर मंत्र्यांनी घोषणा केलेल्या कोट्यावधी रूपयांची गोळा-बेरीज केली तर हजारो कोटी रूपयांची बेरीज होईल. एक गोष्ट असते कोकणच्या विकासासाठी काही द्यायचे नसते त्यामुळे कोट्यावधी रूपयांच्या घोषणा केल्यातर काय फरक पडतो. हे माहित असल्यानेच शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री बिनदिक्कतपणे खोटी आश्वासने देऊन मोकळे होतात. कोविडमुळे अगोदरच विकास निधीला ‘कट’ लावलेला असताना विकास निधी येणारच कसा ? परंतु तरीही खोटं सांगायला, बोलायला काय जात. हजारो कोटी रूपयांच्या घोषणा कोकणच्या विकासासाठी केल्या जातात. महाराष्टÑातील सारेच सत्ताधारी आश्वासनांचा हा हिंदोळा किती काळ झुलवत ठेवणार ? हे त्याचं त्यानाचं ठाऊक, विकासाच्या नावाखाली हि सारी फसवणुक सुरू आहे. कोणताही विकास निधी न येताही कागदी घोडे कसे काय नाचवले जातात? याचा विचार कोकणातील जनतेने करण्याची आवश्यकता आहे.

चिपी विमानतळाचे काम आजही पूर्ण झालेले नाही. सहा वर्षे झाली अनेक मुहर्त शिवसेना आमदार, खासदार मंत्र्यांनी काढले. वर्षभरापूर्वी विमान उड्डाणाचा सोहळा पार पडला. तेव्हा विमान वाहतुक कशी सुरू होणार हे सगळं सांगितले गेले. प्रवाशी कसे येणार हे सांगितले. दोन वर्षापूर्वी गणेशोत्सवात गणेशमूर्ती विमानाने आणण्याचा अट्टाहास माजी राज्यमंत्री आ. दिपक केसरकर यांनी केला. एक दिवशीय विमान लँण्डींग आणि टेक-आॅफचा आनंद कोकणवासियांनी घेतला. विमानतळावरील कामकाजच पूर्ण झालेले नसताना हे राजकिय उड्डाण सतत होत राहिले. यातले सत्य शिवसेना नेत्यांना माहित नाही काय? परंतु कोकणवासियांना आश्वासनांचे खोटे ‘गाजर’ त्यांच्या तोंडी दिले की राजकिय नेते निश्चित होतात. जशी आमदार, खासदार, मंत्र्यांना खोट्या आश्वासनांची सवय झाली हि सवय कोकणातील जनतेने मोडीत काढली पाहिजे. सगळे प्रश्न, सगळे रस्ते तसेच असतानाही बेमालूमपणे खोटं बोलण्याची एक सवयच सत्ताधा-यांना जडली आहे. कोट्यावधी रूपये निधी देत असल्याचे भाषणातून जाहीर केले जाते. जाहीर केलेले आकडे एवढे मोठे असतात की, त्यावरचे ‘शून्य’ पहातानाच नंतर कधीतरी जनतेला कळून चुकते हे सारेच ‘शून्य’ आहे. ‘राजा उदार झाला हाती भोपळा दिला’ तशीच काहीशी अवस्था सत्ताधा-यांची आहे. कोकणातील विमान उड्डाण हे लांबणीवर पडलेले असतानाच शासकीय महाविद्यालय हा विषय सुरू आहे. कॅबिनेटची मान्यता, मुख्यमंत्र्यांचा पाठींबा आणि टाईमलिमीटमध्ये महाविद्यालय पूर्ण करणार असे आश्वासनांचा नवा ‘कारंजा’ शिवसेना पुढा-यांनी उडवला आहे. शासकीय महाविद्यालयाच्या उभारणीमागे लोकहितापेक्षा राणे द्वेषाची किनार आहे. द्वेषभावनाच असल्याचे दर्शन सेना पुढा-यांच्या बोलण्यातून वारंवार स्पष्ट होते. कोणताही विकास प्रकल्पामागे लोकहिताचा शुद्ध हेतू असावा लागतो. सूडबुद्धी, द्वेषभावनेतून प्रारंभ करता येतो परंतु त्याची पूर्तता होण्यासाठी हेतू शुद्ध असावा लागतो. त्यात लोकहित नाही की आणखी काही नाही. राणेद्वेषाने पछाडलेल्यांचा हा सारा खटाटोप सुरू आहे. शासकीय महाविद्यालयाला कोणाचाच विरोध असण्याचे काहीच कारण नाही. परंतु ‘त्या’ प्रकल्पाच्या बाबतीत जी भाषा, भूमिका आणि वर्तन जे दिसते त्यात कुठेही लोकहित वा पारदर्शकता कुठेही दिसत नाही हेच दुर्दैवी आहे. कोकणातील जनतेला हजारो कोटींची दिली जाणारी आश्वासने ही महाराष्टÑाच्या अर्थसंकल्पाच्या आकड्यांएवढी आहेत. यावरूनच यातले सत्य किती आणि आश्वासन किती हे स्पष्ट होते. येणारा काळही किती खोट बोलतात हे अधोरेखित करेल.