बेकायदेशीर नळ कनेक्शन विरोधात आसुद ग्रामस्थ आक्रमक !

आसूद | वार्ताहर

गावात राहणाऱ्या फक्त कुटूंबानाच नळपाणी योजनेचा लाभ मिळावा असा ग्रामपंचायतमध्ये ठराव झाला असतानाही प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या संगमताने एका हॉटेल व्यवसायिकाला सार्वजनिक नळ पाणी योजनेची जोडणी दिल्याने आसुद बागेच्या वाडीतील ग्रामस्थांनी प्रशासकाच्या या कृत्याचा ग्रामपंचायत कार्यालयात जावून आपला संताप व्यक्त करत अनधिकृत कामाबाबत खडे बोल सुनावले. जो पर्यंत ही अनधिकृत नळ जोडणी ग्रामपंचायत प्रशासक काढून टाकत नाहीत तोपर्यंत कोणीही पाणीपट्टी भरणार नसल्याचा स्पष्ट इशारा आसुद बागेच्या वाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासक आणि ग्रामसेवक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

दापोली तालूका ठिकाणच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आसुद गावातील आसुद बागेची सार्वजनिक नळपाणी योजना शासनाकडून सन १९९५ मध्ये कार्यान्वित झाली. सध्या १८७ लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. ही नळपाणी योजना कार्यान्वित झाली त्यावेळी आसुद बागेची गृहीत धरण्यात आलेली लोकसंख्या आता २५ वर्षात निश्चितपणे वाढलेली आहे. त्यामुळे पाण्याचा स्रोत हा येथील ग्रामस्थांची मागणी पूर्ण करू शकत नाही. याचा सारासार विचार करता ग्राम पंचायतीमध्ये जनहीताचा ठराव करण्यात आला आहे की सध्या आसुद हे ठिकाण पर्यटन ठिकाण म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे येथे गावाबाहेरील सधन लोक जागा घेवून पर्यटन व्यवसायाची संकुले उभारीत आहेत त्यांना परवानगी देताना तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून ईमले बांधावेत अशाप्रकारचा ठराव करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र याच ठरावाची पायमल्ली सध्या ग्राम पंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवकांनी होत असून एका हॉटेल व्यावसायिकाला अनधिकृतपणे पाण्याची जोडणी देवून ग्रामस्थांचा राग ओढवून घेतला आहे.

आसुद ग्राम पंचायतीच्या प्रशासकाने एका हॉटेल व्यवसायिकाला सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेतून पाण्याची नळ जोडणी दिलेली आहे. ही नळ जोडणी देताना प्रशासक आणि ग्रामसेवकांने पूर्णतः नियम धाब्यावर बसवून जोडणी दिलेली आहे. आसूद ग्रामपंचायतीवर जेव्हा लोकनियुक्त प्रशासन होते तेव्हा सबंधीत व्यवसायिकाचा अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर हि नळ जोडणी देण्यात आली आहे. जेव्हा हा ठराव फेटाळण्यात आला होता तेव्हा गुरव नामक ग्रामसेवक होते तेच आता ग्रामसेवक आहेत असे असताना ग्रामसेवक सेवक आणि प्रशासकांनी कोणत्या नियमांच्या आधारे ही नळ जोडणी दिली आहे असा सवाल करण्यात येत आहे.

जो पर्यंत दिलेली जोडणी काढली जात नाही तो पर्यंत कोणीही लाभार्थी पाणी पट्टीधारक हे पाणी पट्टी भरणार नसल्याचे ग्रामस्थांनी आसुद ग्राम पंचायतीच्या प्रशासक आणि ग्रामसेवकांना ठणकावून सांगितल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

जाहिरात4