चिपळुणात वीज चोरीचा प्रकार उघडकीस

जाहिरात-2

चिपळूण । प्रतिनिधी

शहरातील उक्ताड येथील मरियम अपार्टमेंटमध्ये वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची तक्रार येथीलच रहिवासी महिलेने महावितरण विभागाकडे केल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे दिला जाणार आहे. यानंतर योग्य ती कारवाई होईल, अशी माहिती पंचनामाकर्ते अधिकारी कनिष्ठ अभियंता आर. ए. मदने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तर ही वीजचोरी गेल्या तीन वर्षांपासून झाली असल्याची घटनास्थळी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, प्रत्यक्षात महावितरणकडून तांत्रिकदृष्ट्या तपास झाल्यानंतर सत्य बाहेर येणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मरियम अपार्टमेंटमधीलच रहिवासी बिल्किस नईम हळदे यांनी मरियम अपार्टमेंटमध्ये वीज चोरी होत असल्याची तक्रार महावितरण विभागाकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. यानुसार कनिष्ठ अभियंता आर. ए. मदने आणि अन्य सहकारी अधिकारी श्री. जगताप व कर्मचाऱ्यांनी शनिवारी घटनास्थळी धाव घेतली असता प्रथमदर्शनी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. शनिवारी दुपारी २.३० वाजता सुरु केलेला पंचनामा ३.४० वाजता संपला. या पंचनाम्यात म्हटले आहे की, मरियम अपार्टमेंटमधील एका ग्राहकाच्या मीटरकरिता वीज खांबावरून काळी केबल आली आहे. या काळ्या केबलवरती बी फेज व न्यूटरलवरून सर्व्हिस वायर मीटर बायपास करून घेण्यात आली आहे. व सदरची सर्व्हिस वायर डीपी स्विचला देण्यात आली आहे व सदरील डीपी स्विचवरून मरियम अपार्टमेंटच्या ए विंगमधील १२ फ्लॅटना देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. या पंचनाम्यात सदनिकांचा तपशिल नमूद करण्यात आला आहे. या पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठांकडे दिला जाणार असून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता आर. ए. मदने यांनी यावेळी दिली. तर घटनास्थळी वीज तारांचे गुंजाळ व ठिकठिकाणी स्विच दिसत होते. एकंदरीत सबधितांने महावितरणची दिशाभूल केलेली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, आता सबधितावर किती दंडाची कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या इमारतीच्या बांधकाम व्यवसायिकाने साठेखताव्यतिरिक्त सदनिकाधारकांशी कोणतीही कागदपत्रे पूर्ण केलेली नाहीत. यामुळे पुढे अनेक प्रश्न उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात4