…. तर मालवण शहरात लवकरच कोरोनाची दुसरी लाट धडकणार

जाहिरात-2

सुदेश आचरेकर ; पर्यटकांची रॅपिड टेस्ट व्हावी 

नगरपालिकेतील आर्थिक भ्रष्टाचाराची लवकरच पोलखोल ; गटनेते गणेश कुशे यांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर
कोरोनाची दुसरी लाट कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र या इशाऱ्याकडे जिल्हा प्रशासन आणि मालवण नगरपालिका प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत असून मालवणात मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या पर्यटकांची कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी केली जात नाही. मुंबईसह दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी सुरक्षिततेसाठी गोव्याचा आश्रय घेतला असून या ठिकाणचे अनेक पर्यटकही सिंधुदुर्गात येऊ लागले आहेत. या पर्यटकांची मालवण शहराच्या सीमेवर रॅपिड टेस्ट होणे अत्यावश्यक आहे. या प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास सिंधुदुर्ग सहित मालवण शहरात कोरोनाची दुसरी लाट कोणत्याही क्षणी येण्याची भीती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, मालवण नगर परिषदेत नगराध्यक्ष आणि कंपनीच्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची लवकरच पोलखोल करणार असल्याचा इशारा गटनेते गणेश कुशे यांनी यावेळी दिला.
येथील कोणार्क रेसिडेन्सी मधील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, विजय केनवडेकर, जगदीश गावकर, महेश सारंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री आचरेकर म्हणाले, दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या संख्येने पर्यटकांनी मालवणात हजेरी लावली. आठ दिवसात ५० हजारापेक्षा पर्यटक मालवणात आले असून येत्या काही दिवसात यापेक्षा दुप्पट पर्यटकांची अपेक्षा आहे. येथे येणारे पर्यटक आरोग्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत, मास्क लावत नाहीत, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. याच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने कोणतीही नियोजन केले नसून या दोन्ही व्यवस्था झोपी केल्याचे चित्र आहे. शहराच्या सीमेवर प्रशासनाने रॅपिड टेस्ट सेंटर उभारणे आवश्यक होते. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची रॅपिड टेस्ट करूनच त्याला शहरात प्रवेश देणे आवश्यक होते, मात्र नगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मालवण शहराला नजीकच्या काळात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. मुंबई सह दिल्लीत कोरोनाची लाट आली आहे. ही लाट पर्यटकांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात यायला वेळ लागणार नाही, असे श्री. आचरेकर म्हणाले.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास भाजप आगळे वेगळे आंदोलन छेडणार

नगरपालिकेच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर केली जाणारी कारवाई दिखाऊ असल्याचा आरोप करून आपण शहरातील जनतेचे काहीतरी देणे लागतो याचा नगराध्यक्षांना विसर पडल्याचा आरोप आचरेकर यांनी केला. शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असताना नगराध्यक्ष झोपले आहेत की त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे ? असा सवाल श्री. आचरेकर यांनी केला. मार्च ते नोव्हेंबर या ९ महिन्यात मालवण नगरपरिषदेची एकही सभा झाली नाही. दोन सभा व्हर्चुअल स्वरूपात झाल्या. त्यामध्ये जनतेचे प्रश्न मांडता आले नाहीत एखाद्या शहरात ९ महिने नगरपालिकेच्या सभा होत नाहीत, अशी घटना मालवण नगरपालिकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. नगराध्यक्षांनी शहरातील जनतेला कोरोनाच्या वेशीवर आणून ठेवले असून त्यांच्याकडून नाकर्तेपणाचा कळस झाला आहे. त्यामुळे त्यांनी जनतेच्या जीवाशी खेळू नये. शहरातील एकाही प्रभागात कोणतेही विकासकाम होताना दिसून येत नाहीत. शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित असून नगरसेवक म्हणून आम्हाला जनतेला याचा हिशोब द्यावा लागणार आहे. यामुळेच नाविलाजास्तव शहरातील प्रश्नांसाठी आम्हाला आवाज उठवणे क्रमप्राप्त ठरले, असे श्री. आचरेकर म्हणाले. यावेळी शहरातील अन्य समस्यांचाही त्यांनी आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने भटके कुत्रे, मोकाट जनावरांचा प्रश्न मांडून शहरातील मोकाट जनावरांचा पालिका प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा भाजपच्या वतीने आगळेवेगळे आंदोलन छेडू, असा इशारा सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला सोडलंय वाऱ्यावर

शासनाने पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ येथे येऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक होते. पर्यटकांपासून सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत आरोग्य व्यवस्थेशी चर्चा करून नियोजन करणे आवश्यक होते. मात्र पालकमंत्री आपले पालकत्व विसरले आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाऱ्यावरच सोडल्याचा आरोप सुदेश आचरेकर यांनी यावेळी केला.

जाहिरात4