इन्सुलीत राज्य उत्पादनची मोठी कारवाई

जाहिरात-2

तब्बल ४४ लाख रुपयांचा दारू साठा जप्त

बांदा | प्रविण परब

तुटलेल्या काचेच्या भंगारातून लाखो रुपयांची दारू वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी नांदेड व उत्तरप्रदेश येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ४३ लाख ४५ हजार ४४० रुपयांच्या दारूसह ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ५० लाख ९६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास इन्सुली डोबवाडी फाटा येथे करण्यात आली. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी शेख सत्तार शेख कासिम पटेल (५०,रा.नांदेड) व मदन इंद्रजीत यादव (४०, रा. उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान आज या दोघा संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याकामी अॅड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, इन्सुली येथील राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यांना गोवा ते मुंबई अशी मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी इन्सुलीत सापळा रचला होता. दरम्यान रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ट्रक (एमएच २६ बीई १५०४) संशयास्पद त्या ठिकाणी आला. यावेळी त्याठिकाणी गाडी तपासणी केली असता त्याने फुटक्या काचाचे भंगार गाडीत असल्याचे सांगितले. परंतु त्यात तपासणी केली असता दारूचे बॉक्स आढळून आले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. एच. चव्हाण, ए. ए. पाडाळकर, रमेश चंदुरे,
एस. एस. साळुंखे, संदीप कदम, शिवशंकर मोपडे आदींनी कारवाई केली.

जाहिरात4