15 लाखांचा मांडूळ साप विकण्यासाठी घाट उतरून आलेले तिघे एलसीबीच्या जाळ्यात

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
तालुक्यातील निवळी- बावनदी येथील स्टॉपजवळ 15 लाख रुपये किमतीच्या मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले.

सतीश युवराज मंडले (25,रा. सांगली ), सुरेश सुनील भोसले (29, रा. शिवडे कराड,सातारा ) आणि महादेव गोरख लोंढे (39, रा.कोपर्डी हवेली,सातारा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून वन्यजीव मांडूळ जातीचा साप आणि एक बोलेरो गाडी (एमएच-50-ए -0450) जप्त करण्यात आली. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार हे पथक मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा ते संगमेश्वर अशी गस्त घालत होते. तेव्हा निवळी- बावनदी स्टॉपजवळ एक बोलेरो गाडी संशयास्पदरित्या दिसून आली. पथकाने त्या गाडीची झडती घेतली असता त्यात जिवंत मांडूळ साप मिळून आला. दरम्यान, वनपाल गौतम कांबळे यांना बोलावून खात्री झाल्यानंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.

ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विकास चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, नितीन ढोमणे, अरुण चाळके, पोलीस नाईक बाळू पालकर, अमोल भोसले,विजय आंबेकर, उत्तम सासवे, सत्यजित दरेकर, प्रवीण खांबे, गुरुप्रसाद महाडिक, चालक दत्तात्रय कांबळे यांनी केली.

जाहिरात4