आरोसबागमध्ये माडावरून पडल्याने युवक जखमी

बांदा | प्रविण परब
आरोसबाग येथील साईश सुवर्णा तारी (१९) हा युवक माडावरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, साईश हा तेरेखोल नदीपात्रालगत माडावर नारळ काढण्यासाठी चढला होता. पाऊस सुरू असल्याने माडावर ओलसरपणा होता. तशातच माडावर चढण्याचा प्रयत्न साईशच्या अंगलट आला व तो घसरून खाली पडला.
यामध्ये त्याच्या डोक्याला, पायाला, हाताला व बरगाड्यांना गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहिस्ता खान यांनी प्राथमिक उपचार केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे समजते.

जाहिरात4