तब्बल ६वर्षानी हरवलेला मुलगा सापडला ; कट्टा पोलीस ठरले देवदूत

चौके -वार्ताहर
मालवण तालुक्यातील गोळवण या गावातील अरुण विजय गावडे हा युवक जून २०१४ पासून आपल्या आई वडिलांना कामानिमित्त गोवा येथे जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर आजपर्यंत गेली ६ वर्षे त्याचा कोणताच ठावठिकाणा नव्हता. आई वडिलांना फोन नाही किंवा कोणतीच खबर नव्हती त्यामुळे त्याच्या आई वडीलांनी कट्टा पोलीस ठाण्यात आपला मुलगा हरवला असल्याची तक्रार दाखल केली होती. अनेक वर्षे लोटली परंतु मुलाचा पत्ता लागत नव्हता.

कट्टा पोलीस ठाण्यातील अंमलदार बदलले पण तरीही त्याची कोणतीही माहिती मिळाली नव्हती मुलगा परत आपल्या घरी यावा भेटावा यासाठी आई वडिलांनी अनेक उपास केले, नवस केले. अखेर त्याच्या हाकेला परमेश्वर रुपाने धावले तो कट्टा पोलीस ठाण्यातील पोलीस रुक्मांगद मुंडे, योगेश सरफदार आणि संतोष पुटवाड हे पोलीस बांधव.बेपत्ता अरुण गावडे याचे जुन्या नंबरचे सिमकार्ड मुदत संपल्याने बंद होणार होते त्यासाठी त्याने दिलेल्या सिमकार्डवर रिचार्ज करण्यासाठी एप्रिल मध्ये कंपनीकडून फोन आला आणि तो फोन त्याच्या घरच्या असलेल्या नंबरवर ही बाब त्याच्या आई वडिलांनी कट्टा पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली.

त्यानुसार कट्टा पोलीसांनी पुन्हा त्या सिमकार्ड कंपनीला संपर्क साधून तो युवक वापरत असलेल्या सिमकार्डचे लोकेशन मिळवले होते मात्र कोरोणा प्रादुर्भाव असल्याने सगळीकडे लाँकडाऊन होते.लोकेशन मिळाल्याची बातमी पोलीसिना गृप्त ठेवली होती अखेर लाँकडाऊन उठल्यानंतर कट्टा पोलीस लोकेशन नुसार गोवा-पणजी येथे पोचले येथील एका हॉटेलमध्ये अरुण गावडे कामाला असल्याचे कळले त्यानुसार पोलीसानी अरुण याला ताब्यात घेऊन सर्व जाबजबाब पूर्ण करुन त्याला गोवा येथून सोमवारी सांयकाळी सिंधुदुर्गात आणून मालवण कट्टा येथे पोलीस ठाण्यात त्याच्या आई वडीलाना बोलावून स्वाधीन करण्यात आले. ६ वर्षांनी एकुलत्या एक मुलाची भेट झाल्यानंतर आई वडिलांच्या आनंदअश्रूंचा बांध पोलीस ठाण्यातच फुटला. तो प्रसंग पाहून समोर असलेली खाकी गर्दीही गहिवरली. पोलीस हे आपल्यासाठी खरोखरच परमेश्वर ठरले असल्याची भावुक मत त्यांनी व्यक्त करत आभार मानले.कट्टा पंचक्रोशीत पोलीसांच्या या माणूसकीचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

जाहिरात4