बांद्यात दारुसह साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई

बांदा | प्रविण परब
गोव्यातून अहमदनगर येथे गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक करताना उत्पादन शुल्क विभागाने बांदा सटमटवाडी येथे कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ४९ हजार २०० रुपयांची दारु जप्त केली. दारू वाहतुकीसाठी वापरलेली १० लाख रुपयांची स्कॉर्पिओ जप्त केली. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली. याप्रकरणी चंद्रकांत संभाजी ओहोळ (४०, रा.पिंपरी, श्रीगोंदा जि. अहमदनगर) याला ताब्यात घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून महाराष्ट्रात गोवा बनावटीची दारू वाहतुक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार बांदा सटमटवाडी येथे सापळा रचण्यात आला होता. अहमदनगर कडे जाणारी स्कार्पिअो कार (एमएच-१६-बीझेड-७०५३) तपासणीसाठी थांबविण्यात आली. कारमध्ये मॅगडॉल कंपनीचे १२ बॉक्स (९६ हजार), मॅगडॉल नं१कंपनीचे ३ बॉक्स (२५,२०० रूपये),मॅगडॉल व्हिस्की (१,२०,०००), मॅगडॉल सेलिब्रेशन(३६०००), ऑफिसर चॉईस (२४०००), गोल्डन एसडब्लू फाईन व्हिस्की (४८०००) असे एकूण ४० विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले.
ही कारवाई आयुक्त वर्मा व विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक एस. ए. भगत, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, यु. एस. थोरात, जवान आर.डी. ठाकूर, दीपक वायदंडे, आर. एस. शिंदे यांनी केली.

 

जाहिरात4