आगरनरळ येथील शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे नेते दिलीप महाकाळ यांचे मुंबईत निधन.

जाहिरात-2

जाकादेवी । वार्ताहर

आगरनरळ गावातील भोई समाजामध्ये जन्माला आलेलेआगरनरळ ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप पांडुरंग महाकाळ उर्फ भाई यांचे बुधवारी पहाटे मुंबई मध्ये निधन झाले.

गेली तीन महिने भाई आजाराशी झुंज देत होते. मात्र आज पहाटे 4 वाजता ती निष्फळ ठरली आणि भाईंची प्राणज्योत मालवली. भाई एक उत्तम संघटन कौशल्य असलेलं एक व्यक्तिमत्व होते. लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्राची प्रचंड आवड. मुंबईसारख्या ठिकाणी राहून नोकरी व्यवसाय करता करता आपल्या मुंबईस्थितच नव्हे तर गावातील समाज बांधवांच्या अडचणीमध्ये धाऊन जाणे , समाजपयोगी कार्यक्रम राबविणे हा स्वभाव गुणधर्म. 1982 साली वामन लवंदे, अशोक लवंदे,  शांताराम भालेकार,  राजेंद्र महाकाळ, कृष्णा महाकाळ, जयप्रकाश भालेकार आदी सहकाऱ्यांच्या साथीने आगरनरळ ग्रामविकास मंडळाची स्थापना केली.

1982 पासून ते आजपर्यंत भाई मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते.मंडळाच्या माध्यमातून ग्रामविकासात्मक कार्यक्रम राबविण्यात महत्वाची भूमिका बजावली. गावातील अनेक लोक दिव्यांच्या प्रकाशात आपला संसाराचा गाडा हाकत होती , अनेक मुले याच अंधुक प्रकाशात आपला भविष्यकाळ प्रकाशमय करण्यासाठी धडपडत होती. हीच बाब आगरनरळ ग्रामविकास मंडळाच्या या शिलेदारांना स्वस्थ बसून देत नव्हती आणि म्हणूनच भाईंनी आपल्या शिलेदारांच्या साथीने आगरनरळ गावामध्ये लाईट आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. शासनाकडे पाठपुरावा केला, लाईटसाठी लागणाऱ्या पोल वाहतूक करण्यासाठी या सर्व मंडळींनी स्वतः मेहनत घेतली.

आज आगरनरळ गाव जो प्रकाशमान दिसतोय त्यांचं सर्व श्रेय भाईंच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास मंडळाला जाते असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. गावामध्ये रस्ता व्यवस्थित नव्हता .नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे येण्यासाठी बसची सुविधा नव्हती. या मंडळींनी त्यावेळचे सरपंच दाजी बाळू लवंदे यांना साथ देत आमदार खासदारांच्या भेटी घेऊन गावात व्यवस्थित रस्ता असला पाहिजे, बसची सुविधा असली पाहिजे यासाठी प्रयत्न केले आणि ते सफलही करून दाखवले. लाईटने तर गाव प्रकाशित केलाच. परंतु इथले विद्यार्थ्यांना सातवी नंतरच्या शिक्षणासाठी मालगुंड, जाकादेवी, वरवडे या ठिकाणी पायी चालत जाऊन किंवा त्या ठिकाणी वसतिगृहात राहून शिक्षण घ्यावे लागत होते. काही विद्यार्थी तर 7 वी नंतर आपले शिक्षण थांबवून मजुरी करत होते. त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता नये . त्यांची पायपीट थांबावी यासाठी भाईंच्या नेतृत्वाखालील मंडळाने 1992-93 साली (कदाचित सन मागेपुढे असू शकेल) आगरनरळ ग्रामविकास मंडळ संचालित ज्ञानमंदिर विद्यालय आगरनरळ याशैक्षणिक संस्थेची स्थापना करून गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले आणि त्यांचे जीवन प्रकाशमय केले.

सुरुवातीला शासनाचे कोणतेही अनुदान नाही, संस्थेच्या मालकीची इमारत नाही.परंतु प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर स्वर्गीय रमाकांत पाटील यांचे घरात विनाअनुदानित तत्वावर आठवीच्या वर्गाने शाळा सुरू करण्याच शिवधनुष्य उचलले आणि ते यशस्वीपणे पेललेही. काही वर्षे पाटील यांचे घरी शाळा सुरू होती.त्यानंतर श्री .वामन लवंदे यांचे घरी पडवीला बरदाने बांधून ८ वी ते १० वीचे वर्ग संस्थेच्या मालकीची इमारत होइपर्यंत सुरू होते.

भाईंनी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्षपद आजपर्यंत यशस्वीपणे भूषविले.त्याजबरोबर अखिल जयगड खाडी भोई समाज मुंबई शाखा माजी अध्यक्ष, आगरनरळ भोई समाज मुंबई शाखा सल्लागार, हनुमान मंदिर ट्रस्टचे सदस्य, कल्याण भोई समाज शाखा सेक्रेटरी या सामाजिक संस्थांची जबाबदारीही अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली. भाईंच्या जाण्याने ग्रामविकास मंडळ तर पोरके झालेच तसेच आगरनरळ भोई समाजामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

जाहिरात4