मालवणात दोन व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह ; एका सुवर्णकाराचा समावेश

जाहिरात-2

व्यापारी महासंघ आतातरी टाळेबंदी बाबतच्या भूमिकेचा फेरविचार करणार का ?

मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या रॅपिड तपासणीत शहरात दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही जण मालवण बाजारपेठेतील व्यापारी आहेत. यामध्ये एका युवा सुवर्णकाराचाही समावेश आहे.

मालवण ग्रामीण रुग्णालयात बुधवारी सकाळी ३४ जणांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये ३२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मशीदगल्ली येथील एक तर भरड वायरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हे दोन्ही जण बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यात टाळेबंदीची मागणी होत आहे. सरपंच संघटना, महिला शिवसेना आणि नागरिकांनी याबाबत जोर धरला असून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मात्र सरसकट टाळेबंदीला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनाच कोरोनाची लागण होऊ लागली आहे. मंगळवारी रात्री फोंडाघाट व्यापारी संघाचे अध्यक्ष सुदन बांदिवडेकर आणि कुडाळ मधील व्यापारी भोगटे यांचे कोरोनामुळे निधन झाले. तर बुधवारी मालवणात दोन व्यापारीच कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे व्यापारी महासंघ आपल्या टाळेबंदीच्या निर्णयाबाबत फेरविचार करणार का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

जाहिरात4