सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ सरसकट टाळेबंदीच्या विरोधात !

जाहिरात-2

९९ टक्के बाधितांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचा दावा

टाळेबंदी लागू केल्यास जिल्ह्याचे अर्थचक्र कोलमडण्याची भीती

मालवण | प्रतिनिधी
सिंधुदुर्गात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सरसकट टाळेबंदी लागू करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र या मागणीला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने तीव्र विरोध दर्शवला असून टाळेबंदी लागू केल्यास अर्थचक्र कोलमडण्याची भीती व्यक्त केली आहे. टाळेबंदीमुळे कोरोनाचा प्रसार थांबू शकत नाही, हे वैभववाडी आणि दोडामार्ग येथे अट्टाहासाने घेतलेल्या टाळेबंदी मुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ टाळेबंदी मागणी एकमुखाने फेटाळत असल्याचे स्पष्टीकरण महासंघाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या मार्च महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह सर्वच नागरिकांनी फार मोठ्या धैर्याने कोरोना महामारी चा मुकाबला करण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले आहे. जवळ जवळ चार सहा महिन्याची कडक टाळेबंदी अनुभवल्यानंतर गणेश चतुर्थी पासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र याच काळात आता कोरोना प्रादुर्भावित लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या संख्ये मागे शासनाने लागू केलेले ‘पुन:श्च हरी ॐ’ अर्थात ओपन अप चे धोरण कारणीभूत नसून कोरोना संक्रमणा बाबत आवश्यक ती किमान खबरदारी न बाळगण्याची लोकांची बेफिकिर मानसिकता, कोरणा बाबत सामाजिक प्रसारमाध्यमातून पसरविण्यात येणारे धादांत खोटे मजकूर व्हिडिओ व त्यातूनच जनमानसात निर्माण झालेली अवास्तव भिती कारणीभूत आहे.
आज संपुर्ण सिंधुदुर्गात तालुका तालुका पातळीवर कोरोना तपासणी सुविधा उपलब्ध झाल्याने मागील तीन महिन्यांच्या तुलनेत दैनंदिन तपासण्याची संख्या कितीतरी पटीने वाढली आहे. साहजिकच त्याच प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पैकी ९९ टक्के बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. याचाच अर्थ चार सहा महिन्यांच्या टाळेबंदीतून काहीही साध्य झाले नसून जगभराच्या सांख्यिकी प्रमाणातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाने सातत्याने ‘टाळेबंदी हा कोरोना रोखण्याचा एकमात्र उपाय नसून प्रत्येकाने आपली काळजी आपणच घेणे आणि शासनाने कोविड १९ अंतर्गत जारी केलेल्या वैयक्तिक संरक्षणाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हा एक आणि एकच उपाय कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी लागू पडणारा आहे’ असे प्रतिपादन सातत्याने करीत आला आहे.
याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी संघाच्या सर्व तालुका अध्यक्षांशी व्यापारी महासंघाचे संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी सविस्तर चर्चा केली. सर्व व्यापारी संघासह जिल्ह्यातील बहुतांश व्यापारी बांधव महासंघाच्या या प्रतिपादनाशी सहमत असून सरसकट टाळेबंदी करून कोरोना रोखण्याच्या दृष्टीने काहीही फायदा होणार नाही; उलट अर्थचक्र बंद पडून त्याचा फार मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसणार आहे, असेच सर्वांचे मत पडले. त्यामुळेच महासंघाच्यावतीने जिल्हास्तरावर टाळेबंदीची कोणतीही घोषणा केली जाणार नाही या अध्यक्षानी घोषित केलेल्या भूमिकेशी ठाम राहण्याचे ठरले. स्थानिक पातळीवर परिस्थितीनुरूप संघटना म्हणून किंवा वैयक्तिकरित्या आपली दुकाने ज्यांना ज्यांना बंद ठेवायची असतील त्यांच्या वैयक्तिक भूमिकेचा किंवा स्थानिक संघटनांच्या निर्णयांचा महासंघ आदरच करील. मात्र संपूर्ण जिल्ह्यात पूर्ण टाळेबंदी पुन्हा लागू करणे हे कोणाच्या हिताचे ठरणार नाही. टाळेबंदी मुळे कोरोना चा प्रसार थांबू शकत नाही हे वैभववाडी आणि दोडामार्ग येथे अट्टाहासाने पुन्हा घेतलेल्या टाळेबंदीने स्पष्ट झाले आहे. या उलट सरसकट टाळेबंदी मुळे आधीच तोळामासा झालेली जिल्ह्याची आर्थिक प्रकृती मात्र गंभीर रूप धारण करील आणि त्याचा फार मोठा फटका या व्यवसायांवर रोजीरोटी अवलंबून असलेल्या हजारो सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना बसणार आहे, याची व्यापाऱ्यांच्या टाळेबंदी साठी कंठशोष करणाऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे. गेले सहा महिने आपल्या कर्मचाऱ्यांचा निदान उदरनिर्वाहा पुरती तरी व्यवस्था करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता स्वतःच्या कुटुंबाच्या आणि व्यवसायाच्या भवितव्याच्या काळजीने ग्रासलेला आहे; हेही अशी मागणी करणाऱ्या प्रत्यक्ष व्यापार उदिमात नसलेल्यानी लक्षात घ्यावे. यातून नजीकच्या भविष्यकाळात अनेक छोट्या स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय परप्रांतीय भांडवलदारांच्या ताब्यात जाण्याचा गंभीर धोका निर्माण होईल; म्हणूनच सरसकट टाळेबंदी ला महासंघ एक मुखाने नाकारत आहे.

ज्यांना टाळेबंदी हा कोरोना प्रसार थांबविण्याचा प्रभावी उपाय आहे असे वाटते त्यांनी ग्राहकांचे बाजारात काळजी न घेता वावरणे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रभावी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. त्याच बरोबर सर्रास होत असलेल्या गुप्त पार्ट्या आणि चोरीछुपे भरणारे जुगार अड्डे या तूनच झालेला कोरोना प्रसार लक्षात घेता अश्या घटना थांवबिण्यासाठी कठोर प्रयत्न झाल्यास महासंघ त्यास सर्वतोपरी सहकार्य करील.

परवा कुडाळ व्यापार संघाच्या बैठकीत कुडाळ शहरात पुन्हा एकदा एका आठवड्याची संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली. त्या पाठोपाठ ओरोस आणि पणदूर येथील व्यापारी संघानी स्वयंस्फूर्तीने टाळेबंदी घोषित केली; या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने हे निवेदन प्रसारित करण्यात येत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात4