रेशन दुकानदार संघटना गुरुवारी आपला निर्णय जाहीर करणार- अशोकराव कदम

जाहिरात-2
संघटनेची व्हीसीद्वारे बैठकीत झाली चर्चा

चिपळूण | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदार व केरोसीन चालक-मालक संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबर पासून संप पुकारला आहे. या संपाला १५ दिवस होत आले तरी शासनाकडून ठोस आश्वासन अद्याप मिळालेले नाही. मात्र दोन मुद्द्यांवर शासन सकारात्मक असल्याची माहिती या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली. यामुळे संघटनेची व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीत राज्य फेडरेशनच्या निर्णयानंतर गुरुवारी आमची भूमिका स्पष्ट करु, असे यावेळी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विरोधातील लढाई अद्यापही सुरूच आहे. या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार रेशन दुकानदारांनी नेहमीत धान्याबरोबरच मोफत धान्याचे रेशनकार्डधारकांना वितरण केले. मात्र, यावेळी राज्यातील काही रेशन दुकानदारांना कोरोनाची लागण झाली. यामुळे महाराष्ट्र राज्य फेडरेशनसह रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार केरोसीन व चालक-मालक संघटनेने शासन-प्रशासनाकडे रेशन दुकानदारांना मोफत धान्य वितरणाचे कमिशन व विमा संरक्षण मिळावे, या मागणी बरोबरच रेशन दुकानदाराच्या अंगठ्या द्वारे अथवा थेट पावती द्वारे रेशन कार्डधारकांना धान्य वितरण करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, मागण्यांकडे शासन-प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या संघटनेने १ सप्टेंबरपासून धान्य वितरण बंदचा निर्णय घेतला आहे. या संपाबाबत शासन- प्रशासनाकडून रेशन दुकानदारांना अद्याप ठोस आश्वासन मिळालेले नाही.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार केरोसीन मालक-चालक संघटनेचे अशोकराव कदम यांनी संघटनेची नुकतीच व्हीसीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत संपाबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी माहिती देताना अशोकराव कदम म्हणाले की, रेशन दुकानदारांच्या पॉस मशीन वर थंबद्वारे ग्राहकांना धान्य वितरण करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडे आहे. मात्र, या निर्णयाबाबत केंद्र सरकार सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे रेशन दुकानदारांना विमा संरक्षण व कमिशन बाबत राज्य शासनाकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या निर्णयानंतर जिल्हा संघटना आपला निर्णय गुरुवारी जाहीर करणार आहे, अशी माहिती यावेळी अशोकराव कदम यांनी दिली. यामुळे हा नेमका निर्णय काय असणार आहे याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात4