14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्‍कमेचा गैरवापर

जाहिरात-2

गुहागर । प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे असणारा सर्व ग्रामपंचायतींचा 14 व्या वित्त आयोगामधील निधीवरील व्याजाच्या रक्कमेचा गैरवापर झाला आहे. केंद्र सरकारच्या निधीमध्ये अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व पदाधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. तसेच व्याजाची रक्कम सर्व ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतींना देण्याबाबतचे आदेश द्यावेत. असे पत्र माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून 14 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वितरीत केला जातो. ग्रामपंचायतींना सदर निधी वितरीत करेपर्यंत त्या निधीवर मिळणारे व्याज ग्रामपंचायतींच्या कामकाजाकरिता वापरता येते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 13 व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाचे पैसे जिल्हा परिषदेकडे मागवून घेण्यात आले व जिल्हा परिषदेने हे सर्व पैसे आरजीएसए खात्यात जमा न करता परस्पर खर्च केले. सदर निधी सम प्रमाणात वितरीत न करता गैरव्यवहार केला.

केंद्र सरकारकडून थेट ग्रामपंचायती पर्यंत सर्व निधी पोहोचवण्याची जबाबदारी राज्य सरकारची व जिल्हा प्रशासनाची असताना या निधीचा, निधीवरील व्याजाचा अन्य ठिकाणी वापर करणे ही आर्थिक अनियमितता आहे. त्यामुळे असा खर्च करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. सदर निधी सर्व ग्रामपंचायतींना देण्यात यावा. यासाठी राज्य सरकारने आदेश द्यावेत. अशी विनंती नातू यांनी केली आहे.

जाहिरात4