लांजा कोट येथील २६ वर्षीय युवकाची आत्महत्या

जाहिरात-2

लांजा । प्रतिनिधी
तालुक्यातील कोट मांडवकरवाडी येथील एका २६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोट मांडवकरवाडी येथील रुपेश विठ्ठल आग्रे (२६ वर्षे) हा कामानिमित्त मुंबईला वास्तव्याला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन कालावधीत मे महिन्यात तो कोट मांडवकरवाडी या आपल्या गावी आला होता. त्यानंतर येथेच राहत होता. यादरम्यान त्याने आपले कोट मांडवकरवाडी येथे नवीन घर देखील बांधायला घेतले होते. सोमवारी सकाळी त्याचे वडील विठ्ठल आग्रे हे नेहमीप्रमाणे रानात गुरे चरविण्यासाठी गेले. त्यानंतर मागोमाग त्याची आई व लहान भाऊदेखील शेतात काम करण्यासाठी गेले होते. यादरम्यान रुपेश हा घरात एकटाच होता. याच कालावधीत त्याने घरातील वाशाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी १० ३० वाजण्याच्या सुमारास रुपेशची आई व लहान भाऊ शेतातून काम आटोपून घरी परत आल्यानंतर त्यांना रुपेशने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी रानात गेलेल्या रुपेशच्या वडिलांना याची माहिती दिली. रुपेशचे वडील विठ्ठल आग्रे यांनी लांजा पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिल्यानंतर लांजा पोलीस ठाण्याच्या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

दरम्यान, अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करीत आहेत. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात4