गणपती आले गावाला चैन पडेना आम्हाला..!

जाहिरात-2

माझे कोकण/संतोष वायंगणकर

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला आता सहा महिने होत आले. सुरूवातीला कोरोना, लॉकडाऊन या शब्दांची आपली ओळखच नव्हती. त्यामुळे त्याबद्दल फार काही माहिती असण्याचे कारणच नाही. परंतु जेव्हा त्याच गांभिर्य लक्षात आले तेव्हा परिणामकताही त्याची सहज जाणवू लागली. त्या परिणामानीच अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. हसती-खेळती घर निस्तेजली. अनेकांच्या चेहºयावरचे हास्य जावून त्याची जागा चिंताग्रस्त चेहºयांनी घेतली. विवंचना आणि विचारांनी नुसते भंडावून सोडले. संयमीपणाही ढळू लागला. त्रस्ततेने अखंड भूमंडल हादरलेले आहे.

कोकण मात्र आजवर जगभरातील आणि आपल्या राज्यातील अनेक संकटांपासून सुदैवाने नेहमीच कोसोमैल दूर राहिले. यामुळे आपल्या कोकणातील जनतेने भयावह वाटणाºया अनेक बातम्या केवळ टिव्ही माध्यमांवर पाहून त्याची दाहकता अनुभवली यामुळे कोकणात कधी काही घडणार नाही होणार नाही. याच मिजासखोरीत आपण वावरत राहिलो. परंतु कोरोनाच्या विषाणुने मात्र जसे जगभरात थैमान घातले तसे ते आपल्या देशातही घातले फक्त जगभराच्या तुलनेत ते आपल्याकडे ते कमीत-कमी राहिले. परंतु कोरोनाच्या नुसत्या असण्यानेही सारे वातावरण निरूत्साही आणि चिंता वाढवणारे झाले आहे.

अवघ्या दोन दिवसांनी कोकणातील प्रत्येक घरा-घरामध्ये गणपतीचे आगमन होईल. कोकणी माणूस मुळातच कमालीचा उत्साही आणि सण साजरा करण्यात त्याचा उत्साह हा फार पराकोटीचा असतो. ऋण काढून सण साजरा करण्याची मानसिकता असलेला सामान्य माणूस अखंड कोकणातील वाडी-वस्तीवर सापडेल. अल्पसंतुष्टता आणि समाधानीवृत्ती हि गुणवैशिष्ट्ये कोकणातील माणसांमध्ये दिसतील. गणेशोत्सव साजरा करण्यात उत्साहाने सहभागी होण्यात कोकणचा हात कोणीही धरू शकणार नाही. बरं हा उत्साहीपणा परंपरेला धरूनच असतो. टाळ-मृदुंग, ढोलताशे, आरती आणि भजनांमध्ये तो मनोभावे रमतो. वाडीतल्या कुणाचेही कितीही वाकडं असलं तरीही गणपती उत्सवात मात्र तो वाकडेपणा, खवचटपणा बाजूला ठेवून आरती करतानाचा उत्साह हा असाच ओसंडून वाहणारा असतो. या गणेशोत्सव काळात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी शहरांमधून व्यवसाय, नोकरीसाठी असणारा चाकरमानी न चुकता गणपतीच्या पाच दिवसात येतो. गावातील कुटुंबियांशी वर्षातील या पाच-सात, अकरा दिवसात गुण्या-गोविंदाने आनंदाने राहतात. खूप छान चाकरमान्यांसाठी, गाववाल्यांसाठी भारलेले दिवस असतात. यावर्षीचा गणेशोत्सवावर कोरोनाची गडद छाया आहे. एप्रिल-मे महिन्यात मुंबईत व्यवस्था होत नाही म्हणून आणि नोकरी, व्यवसाय बंद असल्याने नाईलाज म्हणून अनेक कुटुंब गावी आलेत. त्यातली अनेक कुटुंब परतलेली नाहीत. परंतु तरीही गणपती उत्सवाला यायचचं असं ठरवून असणाºया मुंबईकरांचा मात्र पुरता भ्रमनिरास झाला आहे. महाराष्टÑातील राज्यसरकारने शेवटपर्यंत कोणतेही ठोस धोरण, निर्णय घेतला नाही.

आतापर्यंत निर्णयांचा गोंधळ सुरूच ठेवला आहे. एस.टी. च्या गाड्या सोडायच्या की नाहीत केव्हा सोडायच्या हा गोंधळ शेवटपर्यंत सुरू होता. तिच अवस्था कोकणात धावणाºया रेल्वेबाबतही शेवटच्या दोन-चार दिवसात निर्णय घेतला. कोकणातील गणपतीला यायची इच्छा अनेकांच्या मनात असतानाही यावर्षी कोकणात घरी न येण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. गावातील घराकडचे गणपतीच्या उत्सवाचे वातावरण त्यांच्या नजरेसमोर उभे रहाते आणि त्यांना अस्वस्थ करते. याचे कारण मुंबईकर अनेक चाकरमान्यांनी आजवर कधीही गणेशोत्सव चुकवलेला नाही. खिशात पैसे नसतानाही, उसनवारी करून, प्रवासासाठी येण्याचे साधन नसताना रेल्वेत चेंगराचेंगरी करत आजवर घर गाठणारा कोकणवासिय कधी मुंबईत थांबला नाही. तो गावी, घरी यायचाच. परंतु यावेळी अडचणींचा चक्रव्यूह असा काही उभा राहिला आहे की तो भेदून येणं शक्य होणार नाही. अनेक समस्या पार करणं अवघड झालं आहे यामुळेच ‘गणपती आले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशी काहीशी विचित्र स्थिती मुंबईत असलेल्या चाकरमान्यांची झाली आहे.

जाहिरात4