संगमेश्वरात डॉक्टर, परिचारिका कोरोना बाधित

जाहिरात-2

देवरूख । प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात ४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या बाधितांमध्ये कडवई येथील खासगी डॉक्टर त्यांची पत्नी व मुलगा आणि संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयातील एका महिला परिचारीकेचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १४४ इतकी झाली आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.आर. रायभोळे यांनी दिली आहे.

कडवई येथील एका खासगी डॉक्टर व कुटुंबियांना कोरोना सदृष्य लक्षणे दिसून आल्याने त्यांचे आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून स्वॅब नमुने घेण्यात आले होते. याचा अहवाल शनिवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. अहवालानुसार ५४ वर्षीय डॉक्टर, त्यांची पत्नी (५० वर्षे), मुलगा (२८ वर्षे) यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यातील डॉक्टर व त्यांच्या पत्नीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलग्यावर संगमेश्वर आयटीआय कोवीड सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयातील एका २३ वर्षीय परिचारीकेला कोरोनाची लागण झाली आहे. सदर परिचारीकेची प्रकृती ठीक नसल्याने त्या रजेवर होत्या. याचदरम्यान त्यांचा स्वॅब नमुना घेवून तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. अहवालाअंती या परिचारीकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर संगमेश्वर आयटीआय कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

तालुक्यात मध्यंतरी खंडीत झालेल्या कोरोना पॉझीटीव्ह संख्येत पुन्हा भर पडू लागली आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १४४ इतकी झाली आहे.

जाहिरात4