राममंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात १७० जण सहभागी होणार

जाहिरात-2

अयोध्या (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात १७० जण सहभागी होणार आहेत, असे समजते. यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व विश्वस्त व अयोध्येतील सुमारे ५० मठ, मंदिरांचे महंत गण, रामजन्मभूमी मंदिर आंदोलनांतील काही अग्रणी व अयोध्येशी संबंधित लोकप्रतिनिधीच सहभागी होणार आहेत.

ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत सहभागी होणार आहेत. चातुर्मास सुरू असल्यामुळे ट्रस्टच्या काही सदस्यांनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे.

कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी अतिथींना ई-मेल पाठवले जात आहेत. ते ई-मेलच त्यांची प्रवेशपत्रे असतील. पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षेचे पथक अयोध्येत दाखल झाले. त्यांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वयातून कामही सुरू केले आहे. अयोध्येत येणा-या सर्व मार्गांवर अडथळे लावून तपासणी केली जात आहे.

आंदोलनातील अग्रणी नेत्यांना निमंत्रण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राममंदिर आंदोलनाचे तत्कालीन अग्रणी राहिलेले माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी खा. विनय कटियार, माजी मुख्यमंत्री उमा भारती, साध्वी ऋतंभरा, मध्यप्रदेशात राममंदिर आंदोलन उभारणारे जयभानसिंह पवैया यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. कल्याणसिंह हे ४ ऑगस्ट रोजीच अयोध्येत दाखल होणार आहेत. त्याच्यासाठी स्थानिक हॉटेलमध्ये खोलीही बुक करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री या नात्याने त्यांची व्यवस्था केली जात आहे.

अयोध्येचे खा. लल्लू सिंह, आ. वेदप्रकाश गुप्ता, अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. याबरोबरच अयोध्या धामचे ५५ प्रमुख संत, महंतही आमंत्रित आहेत.

सोमवारपासून अयोध्येत प्रवेश बंदी
पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, सोमवारपासून अयोध्येत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्या दिवसापासून पंतप्रधानांच्या सुरक्षेचे एसपीजी पथक संपूर्ण परिसराचा ताबा घेणार आहे. परिसरात चालू असलेल्या कामातील मजुरांना २ तारखेच्या सायंकाळपासून प्रवेश दिला जाणार नाही. परिसरात व्यासपीठ उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

जाहिरात4