गर्दी टाळून मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव साजरी करूया !

जाहिरात-2

घरानजीकच्या समुद्र किनारी श्रीफळ सागराला अर्पण करा ; नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन

मालवण | प्रतिनिधी ;
मच्छिमार बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून नारळी पौर्णिमा या सणाकडे पाहिले जाते. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करण्याबाबत सक्त आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सोमवारी साजरा होणारा मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव गर्दी न करता नागरिकांनी साजरा करावा, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

बंदर जेटीवर गर्दी होणार नाही याची काळजी घेत नागरिकांनी, मच्छिमार बांधवांनी आपल्या घरापासून जवळ असलेल्या मालवण शहरातील किनारपट्टीवर जावून सागराला श्रीफळ अर्पण करावे. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशांचे सर्वांनी पालन करावे. असेही आवाहन नगराध्यक्ष यांनी केले आहे. बाजारपेठ येथून मिरवणूक न काढता केवळ काही व्यापारी प्रतिनिधी बंदर जेटीवर जाऊन श्रीफळ सागरास अर्पण करणार आहेत. जेटीवर कब्बडी, नारळ लढवणे यासारख्या कोणत्याही स्पर्धा होणार नाहीत. कोणतीही दुकाने मांडली जाणार नाहीत. किल्ले सिंधुदुर्ग येथून ३ वाजता प्रथेप्रमाणे मानाचा श्रीफळ सागराला अर्पण केला जाईल. त्यानंतर व्यापारी बांधव, मच्छिमार बांधव सागराला श्रीफळ अर्पण करतील. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या घरापासून जवळच्या अंतरावर असलेल्या समुद्र किनारी जाऊन सागरला श्रीफळ अर्पण करावे. गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे. गेले चार महिने नागरिक व व्यापारी बांधवांनी प्रशासनास पालिकेला सहकार्य केले. नियमांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे मालवण शहर कोरोनामुक्त राहिले. त्याबद्दल सर्व नागरिक व्यापारी बांधवांचे आभार, यापुढेही नियमांचे पालन करून शहर कोरोनामुक्त ठेवूया, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

जाहिरात4