आडेलीतील “लाल भेंडी”ला सरकार दरबारी हिरवा कंदील

जाहिरात-2

अनंत प्रभू आजगावकर यांना बियाण्याचे मिळाले स्वामित्व प्रमाणपत्र

वेंगुर्ले | दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील श्री. अनंत दिगंबर प्रभू आजगांवकर या प्रगतशील शेतकऱ्याने ‘लाल भेंडी’ ही भेंडीची नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीचे अखिल भारतीय पातळीवर चाचणी प्रयोग होवून त्याचे संपूर्ण अधिकार श्री. प्रभूआजगावकर यांना देण्यात आले आहेत. या जातीच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. त्यामुळेच शासनाने याची दखल घेत सदर भेडींच्या स्वामित्वाचे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात समारंभपूर्वक श्री. अनंत प्रभुआजगावकर यांना डॉ. बी एन. सावंत, सहयोगी संशोधन संचालक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली व वनस्पति जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “कोकणातील शेतकऱ्यांनी जतन केलेल्या गळीतधान्य, कडधान्य व भाजीपाला पीकातील जातीची नोंदणी करणे” हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे कामकाज योजनेचे प्रकल्पप्रमुख डॉ. विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन वैशिष्टयपूर्ण गुणधर्म असलेल्या वाणांचे बियाणे गोळा केले जाते. विद्यापीठ स्तरावर २ वर्षे त्या बियाण्याचे शुध्दीकरण व बीजवृध्दी केली जाते. संबंधित शेतकरी किंवा शेतकरी समूहाच्या नावाने नोंदणी अर्ज भरला जातो. अर्जामध्ये वाणांच्या गुणधर्माची सखोल माहिती दिलेली असते. शेतकरी किंवा शेतकरी समूह यांच्याकडून वाण नोंदणी साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. वाणाची नोंदणी वनस्पति जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. झाडे व वेली यांना १८ वर्षासाठी व बियाणे कायद्यातील इतर वनस्पतींना १५ वर्षासाठी या कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त होते.

दरम्यान श्री. प्रभू आजगावकर यांनी लाल भेंडीची जात विकसित केली. त्या जातीचे चाचणी प्रयोग होऊन त्याचे अधिकार श्री. प्रभुआजगावकर यांना देण्यात आले आहेत. या प्रक्रियेमध्ये त्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पी. एम. हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, प्रकल्प प्रमुख डॉ. व्ही. व्ही. दळवी आणि सहप्रकल्प प्रमुख डॉ. आर. जी. खांडेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
सदर स्वामित्व नोंदणी प्रमाणपत्र त्यांना वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात डॉ. सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांनी लालभेंडीची जात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल असा विश्वास व्यक्त केला. श्री. अनंत प्रभुआजगावकर यांनी विद्यापीठाच्या अतिरत मार्गदर्शनामुळेच मी ही भेंडीची जात विकसीत करू शकलो व या पुढेही याच प्रकारचे काम चालू ठेवणार असल्याचे सांगितले.

दरम्यान प्रास्ताविकपर मार्गदर्शनात डॉ. विजयकुमार देसाई यांनी लालभेंडीची माहिती दिली याप्रसंगी ते म्हणाले की, ‘लाल भेंडी’ जातीची लागवड खरीप मध्ये मेच्या शेवटच्या आठवडयात व उन्हाळयात जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात करावी, ही जात प्रतिकूल तापमान सहन करू शकते. पीक कालावधी १२० ते १३० दिवसांचा असून काढणी सुरू व्हायला ४०-५० दिवस लागतात. भेंडीच्या फळांचा रंग लालसर असून लांबी ७ ते ८ इंच व उत्पन्न एक ते दीड किला प्रती झाड आहे. या जातीची लागवड जम्मू आणि काश्मिर वगळता संपूर्ण भारतात केली जाऊ शकते. ही जात पौष्टीक व शिजवल्या नंतर कमी चिकट असल्यामुळे बाजारात तिला जास्त मागणी आहे. या कार्यक्रमाला श्री. प्रमोद जाधव, उपायुक्त, समाजकल्याण विभाग, सिंधुदूर्ग है उपस्थित होते. त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि वनस्पती जाती आणि शेतकरी प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या स्तुत्य प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे डॉ. एम. बी दळवी, डॉ. सौ. एम. बी. कदम, डॉ. आर. एम. देव्हारे, डॉ. ओ. वाय. मुंज, श्री. आर. ए. राऊत, डॉ. एम. पी. सणस, डॉ. सौ. एस. व्ही. देशमुख, श्री. एन. ए. नलगे, श्री. एस. जी. नाईक व श्री. व्ही. एन. गेडाम इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात4