खेड तालुक्यात कोरोनाची ‘साखळी’ तुटता तुटेना ?

जाहिरात-2
साडेतीनशे चा आकडा पार
देवेंद्र जाधव | खेड 

मार्च महिन्या पासून कोरोनाचा तालुक्यात सुरू झालेला प्रादुर्भाव सध्याच्या घडीला ५ महिन्याचा कालावधी लोटून देखील कायम आहे. त्यात जुलै हा महिना सर्वाधिक कोरोना  रुग्ण वाढीचा ठरला किंबहुना याच महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा विस्फोटच झाला. बघता बघता तालुक्याने साडेतीनशे चा आकडा ओलांडला असून प्रत्येक दिवशी वाढणारी रुग्ण संख्या सर्व सामान्य वर्गाला धडकी भरवणारी आहेत तर प्रशासनाला हादरवून सोडणारी डोकेदुखी ठरू लागली असल्याने वाढत्या रुग्ण संख्ये मुळे तालुक्यात मात्र कोरोना विषाणू ची साखळी तुटता तुटेना चे दाहक वास्तव कायम आहे.

अवघ्या तालुक्याला कोरोना च्या विळख्याने कवेत घेतले आहे. आकडेवारी वाढत आहे. मात्र या विळख्यात कोरोना वर मात करणाऱ्याची संख्या देखील जास्त असल्याने तीच एक बाब दिलासा देणारी ठरली आहे. ग्रामीण भागातील गावे, वाड्या कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने हा विळखा कधी सुटणार ? कधी मोकळा श्वास घेणार याच विवचनेत प्रत्येक गावातील नागरिक कोरोनाच्या भीतीने आला दिवस ढकलत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

कोकणाच्या प्रवेशद्वारा पासून तालुक्याची सुरू होणारी सीमारेषा यामुळे संसर्गाचा सर्वाधिक धोका तालुक्याला असणार हे प्रशासनाने गृहीत धरूनच उपाय योजना आजही सुरू आहेत. मात्र तरी देखील तालुक्यात गाव वाडी व शहरी भागात अगदी चोरपावलाने कोरोनाचा विषाणू दाखल झालाच आणि बघता बघता एक दोन करता कोरोना बाधितांचा आकडा सध्या ३५० ची आकडे वारी पार करत भीतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे . कोरोनाची धास्ती घेऊन मेट्रो शहरातील अनेक जण स्थलांतर करत आहेत. यामुळे या आकडेवारीचा क्रम चढता आहे तर दुसरीकडे लोटे एमआयडीसी मध्ये कोरोनाची साखळी आणखीच गडद होत आहे. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग घरडा कंपनी मधून होऊन लोटेच्या सर्व पंचक्रोशीमध्ये पसरत आजूबाजूची गावे मात्र या विळख्यात पूर्णपणे सापडली आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण वाढत चालले असून लोटे एमआयडीसी मधील घरडा कम्पनी कोरोनाचा हॉट स्पॉट बनली असताना त्यात आणखी चार कंपन्यांची भर पडली आहे. त्यामध्ये विनिती युएस व्हिटामिन , केन, नेरॉलक या कम्पन्या चा समावेश आहे तर सर्वाधिक रुग्ण घरडा कम्पनी मध्ये आढळून आले आहेत.

गेल्या ५ महिन्या पासून कोरोनाच्या दहशतीखाली अवघा तालुका आहे. हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबावर हलाखीची वेळ येऊन ठेपली आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. त्यामुळे या विळख्यापासून सुटका होणार तरी कधी ? याच धास्ती वजा भीती व्यक्त होऊ लागली आहे.

कोरोना रुग्ण वाढीमध्ये जिल्हयात खेड तालुक्याने जुलै या एकट्या महिन्यात कोरोना रुग्ण आकडेवारीचा टप्पा ओलांडत अग्रस्थानी असलेल्या तालुक्यांच्या बरोबरीत आला आहे. ग्रामीण भागातील विळखा काही अंशी  कमी झाला आहे. मात्र शहरात पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे त्यामुळे आता आणखीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून पावले  उचलण्यात आली मात्र बाजारपेठ मधील वाढती गर्दी यामुळे कोरोना चा विसर  च शहरी वासीयांना पडला असल्याचे दिसत आहे त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न च पुर्णतः ‘थिटे’ पडले आहेत संसर्ग काळात आपल्या छातीचा कोट करून प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झटणारी यंत्रणा मात्र वाढत्या रुग्ण संख्ये पुढे ‘हतबल’ होताना दिसत आहे.

एकीकडे दिवसागणिक वाढत जाणारी रुग्ण संख्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरत आहे. मात्र आपत्ती काळात प्रत्येकाने स्वयं शिस्त बाळगणे गरजेचे असताना त्याचाच नेमका सर्वाना  विसर पडून शासकीय नियमांना हरताळ फासला जात आहे. नियम न पाळून होणारा अतिरेक थांबवला गेल्यास बऱ्याच अंशी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. प्रत्येक दिवसाला वाढत जाणारी रुग्ण संख्या यामुळे तालुका ‘शून्य’ रुग्ण संख्या होण्या साठी प्रशासनाने ठोस उपाय योजना हाती घेत त्याची प्रभावी पणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

कारण अजून भय संपलेले नाही.  कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी चाकरमानी वर्गास कोकणात आणण्याच्या घडामोडीना देखील वेग आला असल्याने यावर्षी मात्र या उत्सवावर कोरोना चे सावट मात्र कायम असल्याने कोरोनाची साखळी तुटण्याची शक्यता खंडीत होईल की वाढेल हे आगामी काळच ठरवेल.

जाहिरात4