खेडमध्ये लोटे कळंबणीत होणार ३० खाटांचे कोविड रुग्णालय

जाहिरात-2

खेड । प्रतिनिधी

उत्तर रत्नागिरीत कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून कळंबणी उपजिल्हा रूग्णालयासह लोटे येथील घरडा रूग्णालयात कोविड रूग्णालये सुरू करण्याची मागणी होती. या मागणीला अखेर यश आले असून दोन्हीठिकाणी प्रत्येकी ३० खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.

डॉ. फुले या  खेड दौऱ्यावर आल्या असता त्यांनी शहरातील द. ग. तटकरे सभागृहात सर्व खासगी वैद्यकीय डॉक्टर्स प्रमुख प्रशासकीय अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. त्या म्हणाल्या, कोरोनाबाधितांना उपचारासाठी रत्नागिरी रूग्णालयात दाखल करण्यात येते. यामुळे खेड, मंडणगड, दापोली, चिपळूण व गुहागर तालुक्यांतील  कोरोनाबाधितांची मोठी गैरसोय होत होती. यामुळे कळंबणी उपजिल्हा रूग्णालयासह लोटेतील घरडा रूग्णालयात कोरोना
रूग्णालय सुरू केल्यास कोरोनाबाधितांवर तातडीने उपचार करणे शक्य होईल.

प्रशासनाने मागणी मान्य करत कळंबणी व लोटे येथे प्रत्येकी ३० खाटांचे कोरोना रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रूग्णालये येत्या काही दिवसांतच सुरू होणार असून उपचारासाठी खासगी वैद्यकीय अधिकार्यांची मदत घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी तहसीलदार प्राजक्ता घोडपडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कळंबणी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गरूड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके, नोडल अधिकारी डॉ. चेतन कदम आदी उपस्थित होते.

जाहिरात4