निसर्ग बाधित विद्यार्थ्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण दया !

जाहिरात-2
सचिन तोडणकर यांची केंद्र व राज्य शासनाकडे मागणी
प्रमुख चार मागण्यांचे दिले निवेदन

दापोली । प्रतिनिधी

दापोली मंडणगड तालुक्यात व रायगड जिल्ह्यात निसर्ग वादळामुळे अनेक उद्योग कुटुंब नेस्तनाबूत झाली व २५ वर्षे मागे गेली आहेत. या सगळ्याचा गांभीर्याने विचार करून निसर्ग वादळाने बाधीत झालेल्या क्षेत्रातील कुटुंबातील मूलांकरता शासकीय व निमशासकीय नोकरीत व शिक्षणात आरक्षण दयावे व या भागाकरता नव्याने पर्यटन धोरण ठरवावे अशी मागणी तालुक्यातील अभ्यासु असलेले कर्दे गावचे सुपूत्र विद्यमान सरपंच व पर्यटन उद्योजक सचिन तोडणकर यांनी कोकणवासीय म्हणून केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.

या क्षेत्राकरीत एकूण चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून पर्यटन उद्योग, पर्यटन क्षेत्र गावे जाहीर करणे व विमा याचा समावेश आहे.काही दिवसांपूर्वी दापोली दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय नेते व खासदार विनय सहस्त्रबुद्धे व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन केल्या आहेत. राज्यात २७ वर्षापूर्वी मोठा हाहाकर उडवणारा किल्लारी भूकंप झाला होता. त्यावेळी किल्लारी येथील बाधित क्षेत्रात आशा स्वरूपाचे आरक्षण देण्यात आले व त्याचा उपयोग त्या कुटुंब व विद्यार्थ्यांना आजही शासकीय सेवेत शिक्षणात होत आहे. तशाच स्वरूपाचा विचार कोकणातील निसर्ग वादळाने बाधित क्षेत्रातील संबंधीत कुटुंब व पर्यटन उद्योगांचा व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना बाधित म्हणून दाखला शासनाकडून देण्यात यावा व त्याचा लाभ त्यांना शिक्षणात मिळावा जेणेकरून २५ वर्षे मागे गेलेल्या ‘त्या’ कुटुंबाला मोठा दिलासा मिळू शकेल.

तालुक्यातील मुरुड, लाडघर, आदी पर्यटनाचे हॉट स्पॉट असलेल्या गावांचा समावेश ब वर्ग पर्यटन क्षेत्रात करण्यात यावा जेणेकरून येथील पर्यटन उद्योगाला चालना मिळु शकेल.आशा स्वरूपाची नैसर्गिक संकटे भविष्यातही येऊ शकतात म्हणून बागायतदार ,पर्यटन उद्योग तसेच या भागातील कुटुंबाना विम्याचे संरक्षण शासनाकडून देण्यात यावे जेणेकरून अशी आपत्ती दुर्दैवाने आल्यास शासनावर त्याचा आर्थिक भार कमी होईल आशा मुख्य मागण्या तोडणकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे केल्या आहेत.

शासन न्याय देण्यासाठी प्रयत्नशिल-ना.आदिती तटकरे

या सगळ्या मागण्या आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्री यांच्या कडे मांडू या बाधित क्षेत्राला नक्कीच चांगल्या प्रकारे न्याय देणारी पर्यटन पॉलिसी व संबंधित मागण्या यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन नक्कीच प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही ना.आदिती तटकरे यांनी गेल्या रविवारी २६ जुलै रोजी दापोली दौऱ्यावर असताना पर्यटन उद्योजक व बागायतदार यांना दिली.

जाहिरात4