चिपळूणात कोरोनाचा पाठलाग सुरूच!

जाहिरात-2
कोरोना योद्धे सापडताहेत कोरोनाच्या विळख्यात
दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

चिपळूण । प्रतिनिधी

चिपळुणात कोरोनाचा पाठलाग सुरूच असून सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल २० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून एक रुग्ण आरोग्य विभागाचा कर्मचारी आहे. आतापर्यंत चिपळुणात ४२१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी दिली.

चिपळुणात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहता चिपळुणात कोरोनाचा पाठलागच सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून जी आकडेवारी हाती येते. ती आकडेवारी पाहता दुहेरी संख्येतच रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता सामूहिक संसर्गाचा धोका वाढला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात चिपळुणात तब्बल २० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये चिपळूण व शिरगाव येथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर एक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

चिपळूण शहरात १६, खेर्डी, सावर्डे, कालुस्ते, अलोरे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य व पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत योग्य ती कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, तहसीलदार जयराज सुर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. मात्र, आता दररोज कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सर्वसामान्यांसह नागरिकांनाही काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पेढांबे कोविड केअर सेंटर व्यतिरिक्त माटे सभागृह कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचबरोबर गोवळकोट येथील मदरसा इमारतीची कोविड केअर सेंटरसाठी पाहणी करण्यात आली आहे. यावेळी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

जाहिरात4