सत्तेच्या लालसेत भरकटलेली मुलाखत !

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
ज्या मुलाखतीमधून या संकटकाळात राज्याला एका खंबीर मुख्यमंत्र्यांची भेट होणे अपेक्षित होते त्या मुलाखतीत मात्र आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावरचा नेता बनवण्याची लागलेली घाई आणि सत्ता टिकवण्याची लालसाच अधिक दिसून आली. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा सामना करण्यापेक्षा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नांवरची आवश्यक नसलेली मते आर्थिक संकटात पडलेल्या जनतेला ऐकावी लागली.

शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय स्तरावरचा नेता म्हणून पुढे आणण्याच्या घाईत ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून काही ठाम निर्णयांची, काही ठाम भूमिकांची, काही ठाम निश्चयी बोलण्याची असलेली गरज सामना चे संपादक संजय राऊत यांच्या मुलाखतीमध्ये पूर्ण झालीच नाही. यामुळे कोरोनाशी लढताना अख्खा महाराष्ट्र होरपळून निघालेला असताना, कोरोना पाठोपाठ येणार आर्थिक संकट उंबरठ्यावर आल असताना त्याबाबतचे सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसमावेशक धोरणच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मांडण्यात उद्धव ठाकरे कमी पडल्याचे आणि हे राज्य चालवण्यासाठी ते इतरांवर अवलंबून असल्याचे दिसून आले.

दोन भागात प्रकाशित झालेल्या या मुलाखतीचा बराच गाजावाजा करण्यात आला होता. मात्र आपल्या घरातून राज्यशकट चालवणारे मुख्यमंत्री आमच्याही घरातील प्रश्न आणि आमचे आरोग्य यांचे प्रश्न नेमके जाणतील आणि काही दिलासा देतील ही अपेक्षा यातून मात्र फोल ठरली. यापेक्षाही ही मुलखात उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय नेता म्हणून पुढे आणण्यासाठीचे प्रयत्नच होते संजय राऊत यांच्या प्रश्नांवरून स्पष्ट झाले.

यामुळे आर्थिक गणित बिघडलेला सर्वसामान्य माणूस, विविध प्रश्नांनी होरपळलेल्या विविध भागांतील शेतकरी, अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नेमके काय या विवंचनेत असलेला महाविद्यालयीन युवक, भरमसाट आलेल्या लाईट बीलापासून वाढलेल्या महागाईमुळे आर्थिक गणित बिघडल्याने हैराण झालेली सामान्य गृहिणी आणि राज्यात अनेक ठिकाणी कुचकामी ठरलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे आणि कोरोना काळात वाढलेल्या कालाबाजारामुळे हतबल झालेली जनता यांच्या अपेक्षा या मुलाखतीमधून पूर्ण झाल्याचं नाहीत.

दोन्ही काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडत असले तरीही या मुलाखतीमध्ये श्री. ठाकरे यांचा त्यांच्या सोबतचे नाते जपण्याचा प्रयत्न दिसून आला.

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था साफ कोलमडली असताना अनेक उद्योग बंद झाल्याने तरुणांवर, मजुरांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. अगदी, सरकारी नोक-यांमधूनही कर्मचारी कपात केली जात असल्याचे चित्र आहे. पगार कसा, कुठून द्यायचा हा प्रश्नही प्रशासनाला सतावत आहे. दूध दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनाने शेतक-यांच्या समस्याही समोर आल्या. या पार्श्वभूमीवर, केंद्राकडून राज्य सरकारला मदत होते मान्य करताना मात्र राज्य शासन यासाठी कोणती ठाम भूमिका घेणार आहे, या प्रश्नाच्या उकलीसाठी शासनाने कोणता रोड मॅप केला आहे याबाबत मात्र ठाकरे यांच्याकडून कोणतीही माहिती पुढे आली नाही.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घरात बसून केलेल्या 16 हजार कोटींची औद्योगिक गुंतवणुकीव्यतिरिक्त राज्य शासन म्हणून अन्य महत्वाच्या प्रश्नांची उत्तरेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी विस्तृतपणे दिली नाही.

संजय राऊत यांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासोबतच आघाडी सरकार, भाजपा, राम मंदिर यांच्यावरील प्रश्नांना उत्तरे देताना जितका वेळ मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिला तितका वेळ त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना देणे अपेक्षित होते. परंतु जसा राजकीय भाषणामध्ये शाब्दिक कोटींचा वापर होतो त्याच पद्धतीने उत्तरे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीमधून सर्वसामान्य जनतेच्या कदाचित विरंगुळा झाला असावा मात्र समाधान निश्चितच झाले नाही ही गोष्ट प्रकर्षाने पुढे आली.

नाणार प्रश्नी पक्षप्रमुखांची पलटी; मंत्री तोंडघशी

शिवसेनेची भूमिका म्हणून सांगताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी नाणार होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे सांगण्यात 24 तास उलटले नाहीत तोपर्यंत खुद्द त्यांच्या पक्षप्रमुखानीच यावर पलटी मारल्याचे त्यांच्या मुलखातीमध्ये पुढे आले. जर नाणारला लोकांचा पाठिंबा असेल तर करार पुन्हा करू असे स्पष्ट केल्याने आपल्या पक्षप्रमुखाच्या हवाल्याने नाणारवर बोलणारे मंत्री मात्र तोंडघशी पडले आहेत.

जाहिरात4