खासदारपुत्राचा माज!

विशेष संपादकीय | माधव कदम
शिवसेनेचे सचिव, खा. विनायक राऊत यांचे कर्तबगार पूत्र गितेश राऊत याने कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात ड्यूटीवरील वाहतूक पोलीसांशी अर्वाच्च शब्दांत उद्धट व अरेरावीची भाषा करत, एकेरीवर येत हुज्जत घालून जी दमबाजी केली आणि धमकावले त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. तो पाहील्यावर बडा राजकीय सत्ताधारी नेता असलेल्या बापाच्या जीवावर गुर्मीत वागणाºया मुलाच्या मस्तवालपणाचेच दर्शन घडते. राजकीय सत्ता आणि सत्तेतून मिळविलेल्या धनसंपत्तीतून असा माज काही माणसांच्या अंगी येत असतो त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल.

शुक्रवार, दिनांक १७ जुलै रोजी सायं. ३ वाजण्याच्या दरम्यान कणकवली नाक्यावर घडलेली ही घटना आहे. कणकवली येथील एस.एम. हायस्कूल समोरील हायवेवर बांधण्यात येत असलेल्या बॉक्सेल ब्रीजच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या दुरूस्तीचे काम गेले ३-४ दिवस चालू आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने चालू आहे. त्यावर नियंत्रण करण्याचे काम कोरोना महामारीच्या जीवघेण्या संकटात जीवावर उदार होऊन, धो धो कोसळणाºया मुसळधार पावसात भिजत वाहतूक पोलीस प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेने करत आहेत. त्यांच्या इशाºयाप्रमाणे गेल्या ३-४ दिवसांत या मार्गावरून वाहतूक करणारे सर्वच स्तरातील असंख्य वाहनचालक नाईलाजाने का होईना पर्यायी मार्गाने विनातक्रार प्रवास करत आहेत. अन्य वाहनांप्रमाणेच खासदारपुत्र गितेश राऊत याच्याही आलीशान गाडीला वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांनी इशारा केला ‘महामार्गाच्या दुरूस्तीचे काम चालू आहे, पर्यायी मार्गाने जा’ असेही सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू, ‘खासदारपुत्र असलेल्या मला अडविणारा हा कोण?’ या गुर्मीतच त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पुढील बॅरिगेटवर पोलीसांनी अडवले त्यावेळी खासदारपुत्राने रस्त्यावरच गाडी उभी करून वाहतूक पोलीसांना अर्वाच्च भाषेत उद्धटपणे अपशब्द वापरत अन् दमबाजी करत धमकावले. ‘पोलीसाने तु मला शिवी घातलीस’ असे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ‘तुला माहीत आहे का, मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे, मी तुझी पाच मिनिटांत नोकरी घालविन, मी आता याला सोडणार नाही’ अशा भाषेत चढ्या आवाजात धमकावले. तेव्हा त्या वाहतुक पोलीसाने ‘माझी नोकरी घालविणारे खूप बघीतले’ असा सांगण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

खासदारपूत्राचा हा प्रताप पाहून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशाप्रकारे अन्य कोणी सर्वसामान्य व्यक्तीने पोलीसांना शिवीगाळ करत त्यांच्याशी हुज्जत घालत दमबाजी केली असती, त्यांना धमकी दिली असती तर पोलीसातील खाकी वर्दीने पोलीसी बडगा उगारत, पोलीसी हिसका दाखवत त्याची कॉलर पकडून, गाडीतून बाहेर खेचून त्याला लाठीचा चांगलाच प्रसाद दिला असता. परंतू, बड्या राजकीय सत्ताधारी नेत्याच्या अगर त्याच्या नातेवाईकांकडून असे प्रकार घडतात, त्यावेळी तीच खाकी वर्दी सत्तेपुढे कच खाते. असे बºयाचवेळा घडल्याचे पाहायला मिळते. या प्रकारामुळे मानसिक खच्चिकरण होऊन मन:स्थिती बिघडल्याने वाहतूक पोलीस विश्वजीत परब हे शनिवारी ड्यूटीवर गेले नव्हते, असे समजले. तेव्हा वाहतूक पोलीसांना धमकावत दमबाजी करणाºया खा. विनायक राऊत यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई करण्याची मर्दुमकी सिंधुदुर्गातील वरीष्ठ पोलीस अधिकारी दाखवणार काय?, हा प्रश्न आहे.

कोरोना महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून गेले चार महिने सगळेच वाहतूक पोलीस कोरोनाच्या जीवघेण्या भितीतही कर्तव्य बजावत ड्यूटी करत आहेत. कोरोनाच्या भितीच्या छायेखाली कडक उन्हात आणि आता धो-धो पावसात दिवसरात्र ड्यूटी करणारे वाहतूक पोलीस शरीराने आणि मनानेही थकले आहेत. त्यांच्या मनोधैर्याचे अशाप्रकारामुळे आणखी खच्चीकरण होणार आहे. कोव्हीड योद्ध्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करत त्यांना मानसन्मान करण्याऐवजी त्यांनाच उलट धमकावण्याचे असे प्र्रकार राजकीय सत्तेच्या मस्तीतून होणार असतील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही त्याकडे कानाडोळा करत असतील तर पोलीस कर्मचाºयांनी जीवघेण्या संकटाशी सामना करत कोणाच्या जीवावर रात्रंदिवस ड्यूटी करावी? असा प्रश्न यातून निर्माण होतो.
भाजपाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी वरिष्ठ पोलीस निरिक्षकांची भेट घेऊन गितेश राऊतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आता पुढे कोणती कारवाई करतात याकडे तमाम सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष आहे.

जाहिरात4