कशेडी घाटाचे शुक्लकास्ट संपणार तरी कधी ?

खेड | देवेंद्र जाधव 

अपघाताच्या दृष्ट्या शापित असलेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे आधीच खचून गेलेला रस्ता, त्यात दरडीची भर पडत असल्याने या घाटातील पावसाळ्यातील प्रवास धोक्याचाच ठरत असून गेली अनेक वर्षे या घाटात नैसर्गिक आपत्ती वारंवार घडत असल्याने या घाटाचे शुक्लकास्ट संपणार तरी कधी ? हाच प्रश्न नुकत्याच या घाटात कोसळलेल्या दरडीमुळे ऐरणीवर आला आहे.
कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या या घाटात अपघातांची संख्या कायम आहे. यापूर्वी भीषण अपघात होऊन अनेकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. यामुळेच केंद्राकडून ६ पदरी भुयारी मार्गाची संकल्पना हाती घेत या मार्गाचे काम सुरू आहे. मात्र या कामाला अजून काही वर्षे लोटण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे कोकणातील सर्व  वाहतुकीची सर्व ‘मदार’ या एकटया घाट रस्त्यावर अवलंबून आहे.
कोरोनाचा विळखा जिल्हयासह अवघ्या कोकणात वाढत असल्याने या घाटातून इ पास शिवाय प्रवेश शिवाय प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विशेष लक्ष या घाटात प्रशासनाने वळवले असले तरी या घाटास पर्यायी असलेला ‘विन्हेरे नातूनगर’ घाट रस्ता जिल्हा लॉक डाऊन होण्याच्या आदल्या दिवसापासूनच मोठे दगड मातीचा भराव टाकून बंद करण्यात आल्याने सर्व वाहतुक कशेडी घाटातुन सुरू ठेवन्यात आली होती. मात्र कशेडी घाटात मुसळधार पावसाने निसर्गाने आपला करिश्मा दाखवलाच. त्यामुळे प्रशासनाकडून आपत्ती काळात ज्या मार्गाचे महत्व होते तो बंद केल्याने त्या रस्त्याची गरज देखील प्रशासनाच्या ध्यानी आली. त्यामुळे पुन्हा या घाटात टाकलेले दगड, मातीचा भराव बाजूला करून घाट रस्ता वाहतुकीस मोकळा करावा लागला होता.
दरडीने तब्बल २२ तास घाट बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. मात्र भुयारी घाटाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा न करता या घाटाचे मजबुतीकरणावर भर दिला पाहिजे होता. मात्र या यंत्रणा याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या घाटाचे ‘शुक्लकास्ट’ सध्या तरी संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत.