डिजिटल भारतात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अनेक गावे आजही ‘नॉटरिचेबल’

जाहिरात-2
नेटवर्क च्या शोधार्थ ‘भटकंती’ करण्याची वेळ

देवेंद्र जाधव | खेड

मोबाईल हा जीवनावश्यक गोष्ट बनला आहे. कोरोनाच्या काळात तर भारत देश डिजिटली सक्षम होत आहे. मात्र त्याच भारत देशात असलेला महाराष्ट्रातील खेड तालुका याला अपवाद ठरला आहे.सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या या तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या मोबाईल रेंजच्या बाहेर आहेत.

खेड तालुक्यातील बहुतांशी गावे वाड्या वस्ती तांडे सह्यादीच्या पायथ्याशी वसली आहेत. या ठिकाणी मोबाईल सेवेची कोणतीही सेवा उपलब्ध नसल्याने डिजिटल युगात येथील नागरिक ‘आऊट ऑफ कव्हरेज’ आहे. कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे डिजिटल युगाची पहाट ग्रामीण भागात उगवलेलीच नसल्याने येथील नागरिक मात्र गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिला आहे. ‘कनेकटिंग पीपल’ चे ब्रीद घेऊन शासकीय पातळीवर कार्यरत असलेली बीएसएनएल सारखी सेवा तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामीण भागात पोहचली देखील होती. ठिकठिकाणी मोबाईल टॉवर उभे करून सेवा देण्याच्या हेतूने कार्यरत झाली मात्र अवघा ग्रामीण भाग जोडण्यात बीएसएनएलच्या पदरी अपयशच आले असल्याने ग्रामीण भागातील ‘कनेकटिंग पीपल’ या ब्रीदचा पुरता बोजवारा उडाला आहे. या सेवेला सध्या ‘घरघर’ लागली असल्याने ग्रामीण भागातील नागरिक नेटवर्क मिळण्यासाठी धडपडत असल्याची विदारक चित्र आजही कायम आहे

बीएसएनएल कडून ज्या ठिकाणी टॉवर आहेत अशा ठिकाणी ‘तरंग’ सारखी योजना आणण्यात आली होती. अनेकांनी ही सेवा देखील घेतली मात्र वारंवार खंडित होणारी सेवा अल्पवधीतच गुंडाळण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांना खासगी मोबाईल सेवेचा आधार वाटू लागला. परंतु खासगी मोबाइलची रेंज देखील मिळत नसल्याने नेटवर्कच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे .खासगी मोबाईल कंपन्या देखील ग्रामीण भागाकडे लक्ष देण्यात काना डोळा करत असल्याने  ग्रामीण भाग नो नेटवर्क च्या समस्येने हैराण आहे त्यामुळे यंत्रणा नेमकी करते तरी काय? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला  आहे.
आजच्या घडीला  प्रत्येक व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांना जोडला गेला आहे पण शहर वस्ती सोडली तर ग्रामीण भागातील  नागरिकाला  उपलब्ध असलेल्या  मोबाईल सेवेच्या  नेटवर्क ची वाट पाहत बसण्याची नामुष्कीची ओढवली आहे. त्यात डिजिटल इंडिया सारखा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू झाला असल्याने यात रेशन वितरण सारख्या अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित कऱण्यात आल्या आहेत मात्र नेटवर्क नसल्याने या सेवेला ही मोठ्या प्रमाणात फटका बसू लागला आहे यात यंत्रणा देखील ग्रामीन भागाकडे दुर्लक्ष करत असल्याने ही समस्या आणखीनच तीव्र झाली आहे.

सध्या कोरोनाचे सावट आहे. भिती पोटी अनेक जण घरीच आहेत. मात्र ते देखील नेटवर्कच्या बाहेर आहेत. या आपत्ती काळात  शासनाकडून शालेय शिक्षण ऑन लाईन केले आहे मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑन लाईन शालेय शिक्षणाला देखील मुकत आहे . मोबाईल सेवा गरजेची आहे मात्र यामध्ये लोक प्रतिनिधीनी गाव वाडी वस्ती जोडल्या जाव्यात या करिता राज्य व केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडून गेल्या अनेक वर्षातील ही समस्या दूर करणे काळाची गरज बनली आहे मात्र तसे होताना दिसून येत नाही ही खरी शोकांतिका आहे मात्र यावर आता ‘जनरेटाच’  हवा तरच ‘आऊट ऑफ कव्हरेज’ मध्ये गेलेली गावे कव्हरेज येऊ शकतील. शिवाय  केंद्र आणि राज्य सरकारने या गावांकडे लक्ष देण्याची  काळाची गरज बनली आहे.

जाहिरात4