चाकरमानी रमलेत शेतात…!

संतोष वायंगणकर :- महाराष्टÑात आजही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. उलट या आठवड्याभरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्याही वाढत आहे. काही केल्या कमी होण्याची शक्यता नाही त्यामुळे काळजी घेऊन कोरोना आपल्या सोबत असणारच हे गृहीत धरून चालले पाहिजे. असच संगळ्याचे मत बनले आहे. परंतु यातली काळजी किती व कशी घ्यायची? काळजी कशी करायची या प्रश्नाचे उत्तर सापडणे अवघड आहे. यामुळे यापुढच्या काळात कोरोना असेल किंवा नसेलही परंतु आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत. कोरोनाच्या या पार्श्वभूमिवर मोठ्या संख्येने मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमधून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कोकणातील भूमीपुत्र आहेत. मुंबईकर चाकरमानी तर गावाकडेच आले आहेत. मुंबईतील उद्योग व्यवसाय अस्थिर झाल्याने चिंताग्रस्त असलेले चाकरमानी गावाकडे आले आहेत. आपल्या कोकणातून मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईत गेल्याने इथे मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक राहिली होती. या पडीक राहिलेल्या जमिनीवर कोणीही काही करत नव्हते. गेल्या काहीवर्षात भातशेतीचे क्षेत्र पडीक राहिलेले कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिसून येईल.

भातशेती करण्यासाठी स्वत:च्या घरची माणसं शेतात राबणारी हवी. तरच भातशेती परवडते. नाहीतर शेतीसाठी होणारा खर्च आणि उत्पादित होणारं भात याचा आर्थिक ताळमेळ बसत नाही असच शेतकºयाचे म्हणणे होते. अलिकडे काही वर्षात भातशेतीमध्ये आधुनिकता आली आहे. नवनवीन भरपूर उत्पादन देणारी भातबियाणी बाजारात आली आहेत. त्यातून चांगले उत्पादन होते असे आता शेतकरी म्हणू लागला आहे. यावर्षी कोकणातील गावो-गावची पडीक असलेली भातशेतीची जमीन भात लागवडीखाली आली आहे. शेकडो एकर क्षेत्रात भात लागवड होत आहे. यामागचं नेमकं कारण जाणून घेतल तेव्हा एक बाब प्रकर्षाने पुढे आली ती म्हणजे कोकणात मोठ्या संख्येने आलेले चाकरमानी… भात शेती लागवडीकडे वळल्याचे वास्तववादी चित्र आपल्याला पहावयास मिळत आहे. गावी आलेले चाकरमानी ज्यांची मुंबईतील नोकरी अस्थिर आहे. व्यवसायात स्थिरता नाही .त्यांच्याकडून पुन्हा मुंबईत जाण्याची शक्यता कमी आहे. ते चाकरमानी गावातच शेती-व्यवसायात रमण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक घडी बिघडल्याने अनेकांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे. हि संख्याही फार मोठी आहे. कोरोनाने निर्माण झालेली हि स्थिती केव्हा सुधारेल यासंबंधी कोणीही खात्रीपूर्वक काही सांगू शकत नाही. यामुळेच हि अस्थिरता निर्माण झाली आहे. या अस्थिरतेने आर्थिक संकटात सापडलेल्यांपुढे जगण्याचे प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नांमुळेच शेवटी गावातील शेतीत रमण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. कोकणातील सर्वच जिल्ह्यात पूर्वी भात मोठ्या प्रमाणावर पिकविले जाई. कोकणातील शेतकºयांने भातशेतीतून व्यवसायिकतेचा कधीच विचार केलेला नाही. वर्षभर घरचा तांदूळ जेवणात आहे. याच समाधानात कोकणातील शेतकरी वावरला. परंतु अलिकडे काही प्रगतशिल आणि प्रयोगशिल असलेले शेतकरी शेतीतून कशी आर्थिक उन्नती साधता येईल हा विचार पुढे येवू लागला. यामुळे मग भातशेतीतही नवनवीन प्रयोग सुरू झाले. त्यातून निश्चितच चांगले उत्पादन होवू लागले. शेतात बैलांकडून नांगरणी व्हायची आता टॅÑक्टरच्या माध्यमातून नांगरणी होत आहे. भात शेतीत यंत्राचा वापर वाढला आहे. त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. यापूर्वी भातशेतीने आच्छादलेला हिरवागार गालीच्या बºयाच वर्षांनी पुन्हा एकदा गावो-गावी, वाडीवस्तीवरच्या शेतात दिसणार आहे.

मुंबईत नोकरी व्यवसायात कष्ट करणारे, राबणारे हात यावर्षी स्वत:च्या हक्काच्या शेतात राबणार आहेत. एकीकडे आर्थिक अस्थिरतेची चिंता चेहºयावर आहे. परंतु ज्या गावात-वाडीत लहानपण गेले. आई-वडिलांच्या घामांच्या धारांनी भिजलेल्या मातीत पुन्हा एकदा कष्टाची भाकरी शोधण्याचा प्रयत्न ती भाकरी खातानाचे समाधान आगळेच आहे. केवळ भातशेतीच नाही तर जे शक्य आहे ते पिकवुन उत्पादन करून त्यातून व्यावसायिकता यावी आर्थिक समृद्धीचा मार्ग आपल्याच शेतातून निर्माण झाला तर कष्टाच्या घामाच्या धारांचे शेतात पडलेले शिंपण खºया अर्थाने सार्थकी लागले असे होईल.