कोरोना: आणखी एका लसीची मानवी चाचणी यशस्वी

जाहिरात-2

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी जगभरातून प्रयत्न विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीवरही संशोधन सुरू आहे. आता आणखी एका लसीची मानवी चाचणी यशस्वी झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील बायोटेक फर्म इनोव्हिओने हा दावा केला असून लस ९४ टक्के यशस्वी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इनोव्हिओ कंपनीने आयएनओ-४८०० नावाची लस विकसित केली आहे. या लसीची चाचणी ४० जणांवर करण्यात आली आहे. ही चाचणी ९४ टक्के यशस्वी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. क्लिनिकल चाचणी दरम्यान अमेरिकेत १८ ते ५० या वयोगटातील ४० लोकांना लस देण्यात आली होती. या ४० जणांना चार आठवड्यात दोनदा लशीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर आयएनओ-४८०० लशीमुळे सर्वांच्याच शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या चाचणी दरम्यान, लस टोचल्यामुळे कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून आला नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

इनोव्हिओ कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष केट ब्रॉडरीक यांनी म्हटले की, १० जानेवारी रोजी चीनच्या संशोधकांनी कोरोना विषाणूचा जेनेटिक कोड प्रसिद्ध केला होता. त्याआधारे एक सूत्र तयार करण्यात आले. ही डीएनए लस कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनची ओळख पटवून तशाच प्रकारच्या प्रोटीनची निर्मिती करणार असून कोरोनाच्या विषाणूला निष्क्रिय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पाइक प्रोटीनमुळे मानवाच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होईल. लसीमुळे स्पाइक प्रोटीनची निर्मिती झाल्यास शरीर त्यालाच विषाणू समजून आणखी अ‍ॅण्टीबॉडी तयार करणार. मात्र, या प्रोटीनमुळे शरीराला कोणतेही नुकसान होणार नाही मात्र, कोरोना विषाणूचा खात्मा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या लशीची दुस-या व तिस-या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरू होणार आहे.

जाहिरात4