चीनला अद्दल घडवण्यासाठी २७ देशांची मोर्चेबांधणी

जाहिरात-2

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये सध्या लडाख खो-यात कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान, गलवान खो-यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर देशात निर्माण झालेल्या चीनविरोधी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने परवा ५९ चिनी अ‍ॅपवर कारवाई करून चीनला इशारा दिला आहेत. त्यातच आता सर्वत्र दंडेलशाही करणा-या चीनविरोधात जगातील २७ देशांनी मोर्चा उघडला आहे. या २७ देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे (यूएनएचआरसी) चीनविरोधात तक्रार याचिका दाखल केली आहे.

मनमानी पद्धतीने नजरबंदी, व्यापक टेहेळणी, निर्बंध, उईगरांविरोधात अत्याचार आणि चीनमधील अल्पसंख्याकांच्या अवस्थेबाबत या याचिकेमधून चिंता व्यक्त केली आहे. या याचिकेमध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा हवाला देत चीनने हल्लीच संमत केलेल्या हाँगकाँग सुरक्षा कायद्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच हा कायदा चीन आणि हाँगकाँगमील एक देश दोन प्रणालीच्या विरुद्ध आहे, असे म्हटले आहे.

यूएनएचआरसीमध्ये चीनविरोधात एकत्र आलेल्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, बेलीज, कॅनडा, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, आइसलँड, जर्मनी, जपान, लाटव्हिया, लिकटेंस्टिन, लिखुआनिया, लक्झेम्बर्ग, मार्शल आइसलँड्स, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पलाऊ, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्वीडन, स्वीत्झर्लंड आणि युनायटेड किंग्डम या देशांचा समावेश आहे.

झिजियांग आणि हाँगकाँगपर्यंत पोहोचण्यासाठी चीनकडून परवानगी मिळवून देण्यात यावी, जेणेकरून आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार मिळणारे अधिकार आणि स्वतंत्रतेचे रक्षण करता येईल, अशी विनंती या याचिकेमधून संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांकडे करण्यात आली आहे.

जाहिरात4