नियोजित रत्नागिरी जिल्हा लॉकडाऊन ला रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा

जाहिरात-2
किराणा, भाजी विक्रेते यांनाही दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन; सकाळी 7 ते 9 फक्त दुधाची विक्री

रत्नागिरी । प्रतिनिधी

कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळ यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गासमोर खूप गंभीर आर्थिक अडचण उभी राहिली आहे, याची रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाला जाणीव आहे. सर्ववर्गिय आणि सर्वस्तरिय व्यापाराचे कंबरडे मोडले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विशेषतः मंडणगड आणि दापोली तालुक्यातील बहुतांश व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
परंतु, जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करते आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने १ ते ८ जुलै पर्यंत कडक लॉक डाऊन घोषित केला आहे. तो योग्य आहे, असे महासंघाचे मत आहे.

कोरोना झाला तरी चालेल, परंतु हा लॉक डाऊन नको, असे अनेक व्यापारी सहजपणे बोलताना म्हणतात. परंतु, हा आवेश कोरोनाने घरात प्रवेश करेपर्यंतच टिकू शकतो.

बहुतांश ग्राहक ‘ दो गज की दुरी ‘ अजिबात पाळत नाहीत, याचा अनुभव जवळजवळ प्रत्येक व्यापाऱ्याने घेतला आहे. या सर्वांमुळे व्यापाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या जीविताला धोका संभवतो असे महासंघाला वाटते.

तरी या लॉक डाऊनला आपण रत्नागिरी जिल्ह्यातील किराणा आणि भाजी विक्रेते यांच्यासहित सर्व व्यापारी बंधू आणि ग्राहक यांनी मनापासून आणि उत्स्फूर्तपणे १००% पाठिंबा दिला पाहिजे. आर्थिक अडचणी आणि इतर काही बाबींमुळे हा लॉक डाऊन सर्वांनाच कठीण वाटणार हे निश्चित. परंतु, सामान्य जनता, ग्राहक आणि व्यापारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाचा हा निर्णय योग्य वाटतो. जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत ग्राहकांना कोणतीही अडचण जाणवल्यास जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक व्यापारी यांच्या समन्वयातून त्यावर मार्ग. काढता येईल.

दूध ही दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब असल्यामुळे सकाळी ७ ते ९ या वेळेत दुकानचे शटर पूर्ण बंद ठेवून बाहेर विक्री करण्यास मुभा राहील.

या लॉक डाऊन मुळे; लाईट बिल, बँक कर्जाचे हप्ते, टॅक्स भरणे यामध्ये व्यापाऱ्यांना अडचण येणार आहे. त्यासंबंधीच्या व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील त्यामध्येही जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन, मुदतवाढ किंवा माफी मिळवून द्यावी; असे आवाहन महासंघातर्फे करण्यात येत आहे. नियोजित रत्नागिरी जिल्हा लॉक डाऊन ला रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघ संपूर्ण पाठिंबा जाहीर करीत आहे, असे रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भाऊ वंजारे यांनी सांगितले आहे.

याला उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, मंडणगड; खजिनदार मयुरेश फाटक, दापोली; सहसचिव अशोक सक्रे, पाचल, राजापूर; सहसचिव अमित शेठ, खेड; अजित कोकाटे, सावर्डा, चिपळूण; जयू पाखरे,अध्यक्ष, रत्नागिरी तालुका व्यापारी संघटना; राजेश जागुष्टे, देवरुख, संगमेश्वर; सचिन करवा, खेड; वासुदेव भांबुरे, अध्यक्ष, चिपळूण व्यापारी संघटना; शैलेश वरवाटकर,चिपळूण; अमित कोळवणकर, जाकादेवी आशुतोष शितूत या सर्वांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. यासोबतच चिपळूण किराणा व्यापारी संघ, खेड व्यापारी संघटना, पाचल व्यापारी संघटना, सावर्डे व्यापारी संघटना, पाली व्यापारी संघटना या सर्व स्थानिक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.

जाहिरात4