पंढरीची वारी एक अलौकिक सोहळा

जाहिरात-2

आनंदाचे डोही, आनंद तरंग….आषाढ महिना लागला, की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते वारीचे. पंढरपूरला जाणा-या वारी भक्तीसोहळ्यामध्ये वारकरी अतिशय देहभान विसरुन सहभागी होतात विठू माउलीच्या भेटीची ओढ लागते अन् पावलं पडत जातात आणि मनात आनंदचा वर्षाव होत राहतो. उत्साह कमी होत नाही, की त्यातलं भारलेपण कमी होत नाही.

वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. तो एक संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सदगुण आहे.एकात्मतेची गंगोत्री आहे.वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे.कारण वारकरी संप्रदायत मी नसतो तर तिथे आम्ही असतो. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे.
प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करतांना पांडूरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती.त्यात कोणी उच्च नीच नव्हते,कोण्या एका जातीचे संत नाहीत.संतकवी कोण्या एका गावाचे नाही, घराण्याचेही नाहीत.

सेना-न्हावी, सावता ‘माळी’, नामा ‘शिंपी’, गोरा ‘कुंभार, नरहरी ‘सोनार’ कान्होपात्रा ‘एका वेश्येची मुलगी’, एकनाथ ‘ब्राह्मण’, तर चोखा ‘महार’! अशी एकात्मतेती शिकवण. “विठ्ठलाच्या गावा जावे! विठ्ठलरूप व्हावे!” हेच सत्य. विठ्ठलाला माऊली मानणार्‍या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मुर्ती आहे. सासुरवाशीण मुलगी माहेराला जाताना तिला होणारा आनंद अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिक आनंद देणारी ही ओढ..

प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजागी मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहचते. वारी म्हणजे एका अर्थी ही संत साहित्य संमेलने म्हणा ना! येथे चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकर्‍यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकर्‍यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतानी दाखविली. आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे.
अहो!

एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी‍ सहलीला येणार्‍यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं तसं नाही वारी ठराविक तिथीला निघते आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं.

‘गोपालकाल्यात’ तर सर्वांच्या शिदोर्‍या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात. जे जे अनुभवावे ते ते वेगळेच पण तितकेच विलोभनीय!!! कोरोना विषाणू मुळे जग हादरलय खरे!आणि यामुळे वारी ही होवु शकणार नाही यामुळे अखंडीत आणि अंभग असणारी वारी आज खंडीत झाली खरी पण त्यातली श्रध्दा आणि भक्ती जराही कमी झाली नाही.हे सगळे सोहळे म्हणजे माणसाला माणुसपणाची जाणीव करुन देत मानवतेची शिकवण देणारी एक वेगळी संस्कृती. जी अनेक वर्ष अबाधित आहे.ज्या संस्कृतीने “भेदभेद अमंगळ” म्हणत जगाला “विश्वबंधुत्वाची हाक” दिले समाजातील एकोपा, मैत्री,ऋणांनुबध वृध्दीगत करत कलेची उपासना केली! मुखात “रामकृष्ण हरी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल” म्हणत भक्ति आणि श्रध्देची सांगड घातली जी आजही या संगणक युगात हा संप्रदाय आपले वेगळेपण ठिकवुन आहे.”आई बाप असता घरी का जातोस तु पंढरपुरी? असे ठकावुन सागत आई वडिलांमध्ये ईश्वरी साक्षात्कार घडवण्याची किमया यांच सप्रंदायाने दाखवली.म्हणुनच विठ्ठल दर्शना आधी मातृ-पितृ भक्त असणारा पुंडलिक देवापेक्षा आधी वंदनीय ठरला.हा या विश्वाला मातृ-पितृ सेवेची शिकवण देवुन गेला.
यंदा पायी वारी नाही. त्यामुळेच हा ऐश्वर्याचा पालखी सोहळा मनात आठवत ते घरुनच साजरा करत विठ्ठल भक्तीच्या मानस पूजेत रममाण व्हायचे आहे. वारीचे वाखरीतील रिंगण सोहळा बघून स्वर्गातील देव-देवतांनाही पृथ्वीवर येण्याचा मोह अनावर व्हावा, असा भक्तीचा उत्कट सोहळा आठवायचा आहे .

अहंकारमुक्त.. नवनीतीप्रमाणे निर्मळ अंतकरणी, गोपीचंदन टिळाधारी, तुळशीहारधारी लाखो वैष्णव भक्तगण.. वारकरी सर्व संतां समावेत आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर असतात. त्यांच्या टाळमृदुंगासह हृदयातुन उमटणाऱ्या विठ्ठलनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमतो तेव्हा हा आनंद सोहळा बघण्या सारखा असतो.

वर्णाभिमानासह सर्व अभिमान विसरुन सारे एकसमान आहेत म्हणत एकमेकांचे चरणस्पर्श करणारे माऊली आणि त्यांना सापडलेली ही विठ्ठल नामाची पाऊलवाट हा भवसागर पार करणारी ठरेल, हा तुकोबारायांचा प्रगाढ विश्वास आजही जेव्हा वारक-यांच्या ठायी दिसतो तेव्हा हा महाराष्ट्राचे वैभव अधिकच खुलते आणि अध्यामिक अधिष्ठानांची अनुभुती यांची देही यांची डोळ्या पाहाता येते . आणि मग मनात स्वर लहरी येतात “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल”सर्व संताचा विजय असो….


प्रा.वैभव खानोलकर

नेमळे पंचक्रोशी माध्य.व उच्च माध्य,विद्या.सावंतवाडी

जाहिरात4