भारतात करोनावर पहिली लस तयार, जुलैपासून मानवी चाचणी

जाहिरात-2

“करोनावर देशात पहिली लस तयार करण्यात भारत बायोटेक कंपनीला यश आले आहे. या मानवी चाचणी घेण्यासाठी या लसला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पुढच्या महिन्यापासून मानवी चाचणी सुरू होणार आहे. भारत बायोटेक या कंपनीने यापूर्वीही अनेक लस तयार केल्या आहेत. लस बनवण्याचा कंपनीला मोठा अनुभव आहे. “

 

मुंबई: देशात करोनाचे रुग्ण ५ लाखांवर गेले आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा स्थितीत एक चांगली बातमी आहे. भारतात करोनावरील लस तयार झाली आहे. भारत बायोटेकने ही लस बनवली आहे. यातील आनंदाची बाब म्हणजे या लसीच्या मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय ) दिली आहे.

भारत बायोटेक ही हैदराबादमधील फार्मा कंपनी आहे. या कंपनीने करोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. करोनावरील ही लस फेज-१ आणि फेज-२ या मानवी चाचणीसाठी डीसीजीआयने परवानगी दिली आहे. मानवी चाचणीचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिलीय. भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव आहे. पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने लस बनवल्या आहेत.

करोना व्हायरसशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेन पुण्यातील नॅशलन इन्सिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)मध्ये वेगळं केलं गेलंय. यानंतर हा स्ट्रेन भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात आला. भारत बायोटेकने तयार केलेली लस ही करोनावरील देशातील पहिली लस आहे. हैदराबादमधील जिनोम व्हॅलीत अति सुरक्षित लॅबमध्ये बीएसएल-३ (बायोसेफ्टी लेव्हल ३ ) ही लस बनवण्यात आली आहे.

कंपनीने प्री-क्लिनिकल स्टडी आणि इम्यून रेस्पॉन्सचा अहवाल सरकारला सादर केला आहे. यानंतर डीसीजीआय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या लसीच्या फेज-१ आणि फेज-२ या मानवी चाचणीला परवानगी दिलीय. यामुळे देशभरात जुलै महिन्यापासून या लसीची चाचणी सुरू होणार आहे.

देशात तयार केलेली ही पहिली लस आहे. ही लस बनवण्यात आयसीएमआर आणि एनआयव्हीने मोठी भूमिका बजावली आहे. तर डीसीजीआयने मानवी चाचणीची मंजुरी देऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिसर्च अँड डेव्हलप टीमच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. आम्ही हे काम सार्थक करू शकलो, असं भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा यांनी सांगितलं.

जाहिरात4